सरपंचपदाचा लिलाव: ग्रामविकासमंत्री मुश्रीफ संतापले

मुंबई : राज्यात सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटींची बोली लागल्याचा प्रकार समोर येताच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला आहे. लिलाव करून सरपंचाची बिनविरोध निवड करणे, ही पद्धत लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी आपण राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रार करणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी राज्यातील काही आमदार आपापल्या मतदारसंघात काम करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या 30 रोजी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यात सर्व्हर जाम झाल्यानं जात पडताळणी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी कोट्यवधींचे लिलाव होत आहेत. सरपंचपदाच्या लिलावाचा प्रकार उजेडात आल्याने या पद्धतीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या ग्रामपंचायती सरपंचपदाचा जाहीर लिलाव करत असतील तर निवडणूक आयोगानं गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्याबरोबरच सरपंचपदाची लिलाव पद्धत लोकशाहीला अत्यंत घातक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत आपण राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.