कर्जत जामखेडमधील दहशतरुपी ‘लंका’ दहन करण्यासाठी ‘रामभक्त’ हनुमान सेना सज्ज – सचिन पोटरे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत जामखेडच्या विद्यमान आमदाराने मागील अडीच वर्षांत दहशतीचे राजकारण केले. एखाद्याने सोशल मीडियावर जर विरोधात कमेंट केली तर त्याला धमकावले जायचे. कोण आहेस तु ? कुठला आहेस तु? तुला तालुक्याच्या ठिकाणी यायचं आहे की नाही? अश्या धमक्या दिल्या जायच्या.एवढचं नाही तर प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरावर यांनी दोन-दोन तीन-तीन वेळा हल्ले केले. परंतू आम्ही डगमगलो नाही कारण आम्ही आमदार राम शिंदेंचे कार्यकर्ते आहोत. अडीच वर्षे रोहित पवारांच्या दडपशाही विरोधात आम्ही लढत राहिलो.कर्जत जामखेडमध्ये असलेली व आता नगर दक्षिणेत येऊ पाहणारी दहशतरुपी लंका दहन करण्यासाठी ‘रामभक्त’ हनुमान सेनेने सज्ज व्हावे, असे अवाहन सचिन पोटरे यांनी केले.

Rambhakta Hanuman Sena ready to burn terrorist Lanka in Karjat Jamkhed - Sachin Potare

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने (महायुतीने) प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका सूरू आहे. अश्यातच जामखेडमध्ये गुरूवारी पार पडलेल्या जाहीर सभेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आमदार रोहित पवार व उमेदवार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर निर्माणाचे कार्य पुर्ण करत 527 वर्षांपूर्वीचे स्वप्न पुर्ण केले आहे. ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. देशात रामराज्य आणण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असणे आवश्यक आहे. मोदी हेच भारताला जागतिक महासत्ताक करू शकतात. म्हणून यंदाच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा जिंकून देण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, नगर दक्षिणेत विकासाची गंगा आणण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे डाॅ सुजय विखे-पाटील यांच्या विजय निश्चित असल्याचेही पोटरे म्हणाले.

मागील पाच वर्षांत खासदार डॉ.सुजय विखे-पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघात आढळगाव ते जामखेड, अहमदनगर- सोलापुर या दोन राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले. यासाठी केंद्र सरकारने कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबरोबर विकासाची अनेक कामे मार्गी लागली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा मतदारसंघातील नागरिकांना मोठा फायदा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी डाॅ सुजय विखे-पाटील यांना पुन्हा एकदा खासदार बनवावे. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असे अवाहन सचिन पोटरे यांनी केले.

रामभक्त हनुमानाची सेना येत्या 13 तारखेला दहशतरूपी लंकेचे दहन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी डाॅ सुजय विखे-पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे अवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी केले.