जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ गोरक्ष ससाणे यांच्या जागी डॉ. अनिल काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 1 जुलै रोजी आपला पदभार स्वीकारला. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.
डॉ. अनिल काळे हे जीव रसायनशास्त्राचे प्राध्यापक व विभाग प्रमुख तथा प्रभारी अधिकारी राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत होते. आता डाॅ काळे हे हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहणार आहे.महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मान्यतेने डाॅ काळे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.
डॉ. अनिल काळे यांच्या रूपाने महाविद्यालयास एक कार्यक्षम आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारे व्यक्तिमत लाभले आहे. विद्यार्थ्यांसाठी नियमित तासिका, प्रात्यक्षिके, सुसज्ज वाचनालय, जिमखाना, वैद्यकीय सुविधा इत्यादी बाबींवर भर देणार असल्याचे काळे यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर काळे यांनी महाविद्यालयाची इमारत, वसतिगृहे, वाचनालय, जिमखाना, प्रक्षेत्र यांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात कृषि दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, प्राध्यापक वृंद डॉ. प्रेरणा भोसले, पोपट पवार, डॉ. मनोज गुड, डॉ. नजिर तांबोळी, अरुण पाळंदे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.