Karjat MIDC : कर्जत एमआयडीसीचे होणार रुपरेखा सर्व्हेक्षण, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मिळाले मोठे यश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे हे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील होते.अखेर आमदार शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. कर्जत एमआयडीसीचे रुपरेखा सर्व्हेक्षण उद्या 3 जुलै 2024 रोजी होणार आहे.या सर्वेक्षणानंतर प्रस्तावित जागेच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे. कर्जत तालुक्यात एमआयडीसी व्हावी ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आता पूर्णत्वाच्या दिशेने जाऊ लागली आहे. मतदारसंघातील युवकांनी MIDC चे पाहिलेले स्वप्न आमदार प्रा राम शिंदे यांच्या निरंतर पाठपुराव्यातून साकार होणार असल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवा वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून कर्जत एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना आमदार रोहित पवार यांनी पाटेगाव – खंडाळा भागात एमआयडीसी उभारण्याचा घाट घातला होता. देशाला फसवून परागंदा झालेल्या निरव मोदी व इतर धनदांडग्यांच्या जागेत ही एमआयडीसी होणार होती,परंतू आमदार प्रा.राम शिंदे यांनी रोहित पवारांचा हा डाव हाणून पाडला. महायुती सरकारच्या माध्यमांतून आमदार प्रा.राम शिंदे यांनी मौजे कोंभळी परिसरात 1200 एकर जागेत एमआयडीसी मंजुर करून आणली.
गोरगरीब शेतकऱ्यांच्या जागेत होणाऱ्या या एमआयडीसीला गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवारांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. परंतू गोरगरीब शेतकऱ्यांच्या बाजूनेच आमदार राम शिंदे हे ठामपणे उभे राहिले आहेत. कर्जत तालुक्यातील हजारो युवकांचे एमआयडीसीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शिंदे यांनी सरकार दरबारी आपले राजकीय वजन वापरत एमआयडीसीचा प्रश्न निकाली काढण्यात यश मिळवले आहे.
उद्या 3 जुलै 2024 रोजी कर्जत एमआयडीसीच्या भूसंपदनापूर्वीचे रुपरेखा सर्व्हेक्षण ( contour survey ) होणार आहे. या सर्व्हेक्षणासाठी औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व्हेक्षण पथक येणार आहे. हे सर्व्हेक्षण पुर्ण होताच भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे.आमदार प्रा राम शिंदे यांनी केलेल्या जोरदार पाठपुराव्यामुळे 15 मार्च रोजी उद्योग विधागाच्या उच्चाधिकार समितीने कर्जत तालुक्यातील कोंभळी, थेरगाव, रवळगाव या भागातील 481.98 हेक्टर क्षेत्राला तत्वता: मान्यता देत कर्जत एमआयडीसीला मंजुरी दिली होती. त्यानंतर कर्जत एमआयडीसीच्या निर्मितीला वेग आला.
आता उद्या 3 रोजी सदर प्रस्तावित जागेचे रूपरेखा सर्वेक्षण होणार आहे. त्यानंतर भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कर्जत एमआयडीसीचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष एमआयडीसीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे आता बोलले जात आहे. कर्जत एमआयडीसी प्रत्यक्ष साकार होण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेऊन आपल्या भागाचा सर्वांगिण विकास करणे यासाठीच माझा अग्रक्रम राहिलेला आहे. त्याचदृष्टीने कर्जत तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून माझा पाठपुरावा सुरु होता. महायुती सरकारने कर्जत एमआयडीसीला मंजुरी दिली आहे. प्रकरण 6 लागू होण्यापूर्वी कंटूर सर्व्हेक्षणाचा महत्वपूर्ण टप्पा 3 जुलै 2024 ला पुर्ण होणार आहे त्यामुळे प्रस्तावित जागी नियोजित एमआयडीसी होण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. महायुती सरकारने कर्जतमधील युवकांच्या आशा आकांक्षेला प्रतिसाद देत अत्यंत विक्रमी कालावधीत एमआयडीसीला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री, उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मनापासून आभार”