जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कर्जत जामखेड मतदारसंघात राजकीय भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत. रोहित पवारांचे कट्टर समर्थक अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या तालुक्यातील मोठ्या गावाच्या माजी उपसरपंचाने रोहित पवारांची साथ सोडत भाजपात प्रवेश केला आहे. या राजकीय भूकंपामुळे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
कर्जत – जामखेड मतदारसंघात पक्षांतराचे वारे पुन्हा एकदा जोरदारपणे वाहू लागले आहे. याचा सर्वात मोठा फटका रोहित पवार गटाला बसू लागला आहे.जामखेड तालुक्याच्या राजकारणात राजकीयदृष्ट्या निर्णायक असलेल्या जवळा गावचे उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर यांनी रोहित पवारांची साथ सोडत आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीत नुकत्च प्रवेश केला आहे. वाळूंजकर यांच्या प्रवेशामुळे जवळा गावच्या राजकारणात भाजपची ताकद वाढली आहे.
काकासाहेब वाळुंजकर हे जवळा गावच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आहे. काकासाहेब वाळुंजकर यांच्या कुटुंबात गेल्या १५ वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्यपद आहे. तसेच जवळा सोसायटीचे संचालक म्हणून त्यांचे वडील व चुलते यांनी काम केले आहे. काकासाहेब वाळुंजकर यांच्या पत्नी मागील पाच वर्षे जवळा गावच्या उपसरपंच म्हणून काम केले आहे.
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जवळा ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत युवा नेते प्रशांत शिंदे, काकासाहेब वाळूंजकर व त्यांच्या टीमने राजकीय चमत्कार घडवत ग्रामपंचायतची एकहाती सत्ता मिळवली होती. मागील पाच वर्षांत त्यांनी जवळा गावात राबवलेल्या विविध विकास कामांच्या जोरावर जनतेने त्यांच्या हाती पुन्हा ग्रामपंचायतची सत्ता सोपवली. यामुळे येथील राजकारणावर प्रशांत शिंदे – काकासाहेब वाळुंजकर व त्यांच्या टीमचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
मध्यंतरी काकासाहेब वाळूंजकर यांनी काही कारणामुळे रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. वाळुंजकर हे काही महिने राष्ट्रवादीत रमले. तिथे त्यांना वाईट अनुभव आला. रोहित पवार हे फक्त चमचेगिरी करणाऱ्या, पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना किंमत देत असल्याच्या कारणामुळे माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर यांनी राष्ट्रवादीची साथ देत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. वाळूंजकर यांच्या भाजप प्रवेशामुळे रोहित पवारांना जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. काकासाहेब वाळुंजकर यांच्यासारखा महत्वाचा मोहरा रोहित पवारांमा सांभाळता न आल्याने जवळ्याच्या राजकारणात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
जवळा गावचे माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका खेडकर, बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, पांडुरंग उबाळे, बापुराव ढवळे, सरपंच सुशिल आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य राहुल बाप्पा पाटील, मेजर सोमनाथ वाळुंजकर, नितीन कोल्हे, अनिल हजारे, प्रविण सानप, अमित चिंतामणी, प्रविण चोरडिया सह आदी उपस्थित होते.