… म्हणून निवडणुका पुढे ढकला, भाजपच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.या निवडणुका ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय होणार असल्याने राज्यातील ओबीसी समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढत असल्याने निवडणुका पुढे ढकलाव्यात असाही सुर आता उमटू लागला आहे.

राज्यात सर्वदूर पडणारा पाऊस, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण तसंच ओबीसी राजकीय आरक्षणाचा अनुत्तरित प्रश्न लक्षात घेता नगरपालिका निवडणुका पुढे ढकला, असं निवेदन राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना आज भाजपच्या वतीने देण्यात आलं आहे.

यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आ. राम शिंदे, माजी मंत्री आ.चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह पदाधिकारीही उपस्थित होते.

भाजपने ओबीसी आरक्षण आणि राज्यात पडणारा पाऊस ही दोन कारणे पुढे करत निवडणुका पुढे ढकलाव्यात ही मागणी आज निवडणूक आयोगाकडे केली आहे. यापूर्वी भाजपच्या वतीने प्रभाग रचना रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली होती, मात्र निवडणूक आयोगाने या मागणीकडे दुर्लक्ष करत राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या.

भाजपकडून करण्यात आलेल्या नव्या मागणीमुळे राज्य निवडणूक आता का निर्णय घेणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.