ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना जर कुणी दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कशीच गय केली जाणार नाही. लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे असा आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायत निवडणुकीत गडबड गोंधळ निर्माण करू पाहणाऱ्या गावपुढाऱ्यांना आ. रोहित पवारांनी दम भरला यामुळे आता रोहित पवारांनी थेट ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातल्याचे स्पष्ट झाले.

कोरोना महामारीने (Covid 19) आणि नैसर्गिक संकटाने अगोदरच आपल्याला खुप मोठ्या आर्थिक संकटाचा (Economic crisis) सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजुला ठेऊन निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चास फाटा देत गावच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायचे आहे.

आर्थिक खर्च वाचवण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वादांना देखील संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांनो ग्रामपंचायत निवडणुका (Grampanchayat Election) बिनविरोध करा अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना ३० लाखांचा विकासनिधी (Development Fund) घ्या,अशी साद राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) तालुक्यातील नागरिकांना घातली आहे.

कर्जत (Karjat) तालुक्यातील सुमारे ५६ तर जामखेड (Jamkhed) तालुक्यातील ४९ गावांच्या ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्या अनुषंगाने आ.रोहित पवारांनी ही घोषणा केली आहे.बिनविरोध निवडणुका पार पाडलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातूनही अधिकचा निधी देण्यात येणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.