BulliBai App Case। बुल्लीबाई ॲपचा मुख्य सूत्रधार जेरबंद, दिल्ली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : देशभर खळबळ उडवून देणाऱ्या बुल्लीबाई ॲप प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आसाममधून एका तरूणाला अटक केली आहे.

मुस्लिम महिलांचे फोटो टाकून बदनामी करण्याबरोबरच ऑनलाईन बोली लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चार दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. बुल्लीबाई ॲपच्या माध्यमांतून हे कटकारस्थान रचण्यात आले होते. या प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली होती.

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत दोन तरूणासह एका तरूणीला अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या धडक कारवाई नंतर दिल्ली पोलिसांनीही बुल्लीबाई ॲपचा निर्माता व मुख्य सूत्रधार असलेल्या तरूणाला आसाममधून गुरूवारी अटक केली आहे. ही कारवाई दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील IFSO (इंटेलिजन्स फ्युजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन यूनिट) ने ही कारवाई केली.

अटक केलेल्या तरूणाला आज सायंकाळपर्यंत दिल्लीत आणले जाणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने नीरज बिश्नोई या 21 वर्षीय तरूणाला आसाममधून अटक केली आहे. नीरज हा बुल्लीबाई ॲपचा मुख्य सूत्रधार आहे. नीरज याच्या अटकेनंतर या प्रकरणाचे सत्य आता समोर येईल. दिल्ली पोलिस कसा तपास करतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत बंगळूर येथून विशाल कुमार झा, उत्तराखंड येथून श्वेता सिंग (वय18) आणि मयंक रावत या तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील विशाल कुमार झा याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Vishal Jha, shweta Singh, Mayank Rawat )