धक्कादायक : जामखेड बाजार समितीच्या संचालकावर प्राणघातक हल्ला, जामखेड न्यायालयाच्या आवारातील घटना, दोघा जणांविरोधात गुन्हे दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणात साक्ष देण्यास आलेल्या, जामखेड बाजार समितीच्या संचालकावर दोघा जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जामखेड न्यायालयाच्या आवारात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोघा आरोपींविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील यांना जामखेड न्यायालयाच्या आवारात आज मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बबन नरहरी मदने व श्रीनिवास ऊर्फ भाऊ बबन मदने या दोघा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
जामखेड तालुक्यात खर्डा येथील बबन नरहरी मदने, श्रीनिवास ऊर्फ भाऊ बबन मदने यांचे सन 2020 मध्ये जामखेड बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील यांच्याशी वादावादी होऊन मारहाणीची घटना घडली होती. या घटनेत वैजीनाथ पाटील यांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे पाटील यांनी बबन नरहरी मदने व त्यांच्या दोन मुलांविरूध्द जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण होऊन जामखेड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. यात साक्ष घेण्याचे काम न्यायालयात सुरू होते.
आरोपींकडून फिर्यादीस न्यायालयाच्या आवारात मारहाण
दरम्यान, वरिल प्रकरणातील फिर्यादी वैजीनाथ पाटील हे आज 24 ऑगस्ट 2023 रोजी जामखेड न्यायालयात साक्ष देण्यासाठी आले होते. त्याचवेळी कोर्टाच्या आवारात उपस्थित असलेल्या बबन नरहरी मदने व श्रीनिवास ऊर्फ भाऊ बबन मदने हे दोघे वैजीनाथ पाटील यांच्या जवळ आले. तु कोर्टात आमच्या विरोधात साक्ष देतो काय ? असे म्हणुन त्या दोघांनी वैजीनाथ पाटील यांना लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी बबन मदने याने त्याच्या हातातील लोखंडी टामीने पाटील यांच्या डोक्यावर वार केला.
‘तु जर आमच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली तर आम्ही तुला पाहून घेऊ’
तर श्रीनिवास ऊर्फ भाऊ बबन मदने याने पाटील यांच्या छातीवर बसून गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही झटापट सुरू असतानाच वैजीनाथ पाटील यांच्या ओळखीच्या भास्कर जायभाय, श्रीराम जायभाय, कृष्णा सोपान भूते, नितीन सुरवसे, मनोज पाटील यांनी भांडणे सोडवली. ‘तु जर आमच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली तर आम्ही तुला पाहून घेऊ’ अशी धमकी दोघा आरोपींना वैजीनाथ पाटील यांना दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे.
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हे दाखल
जामखेड न्यायालयाच्या आवारात फिर्यादीवर आरोपींनी प्राणघातक हल्ला करण्याची घटना उघडकीस येताच सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. वैजीनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात बबन नरहरी मदने व श्रीनिवास ऊर्फ भाऊ बबन मदने या दोघांविरोधात कलम 307, 324, 323, 504,506, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.
त्या घटनेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
वैजीनाथ पाटील हे जामखेड भाजपाचे नेते आहे. जामखेड बाजार समितीचे विद्यमान संचालक म्हणून पाटील हे कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी संजीवनीताई पाटील खर्डा गावच्या सरपंच आहेत. वैजीनाथ पाटील यांच्यावर न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान सदर घटनेची जामखेड न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे अश्या घटना होऊ नयेत यासाठी न्यायालयाच्या आवारात तातडीने पोलिस बंदोबस्त वाढवण्याच्या सुचना न्यायालयाने जामखेड पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती आता समोर येत आहे.
भाजपने दिली खर्डा बंदची हाक
जामखेड बाजार समितीचे संचालक तथा खर्डा गावच्या सरपंच संजीवनीताई पाटील यांचे पती वैजीनाथ पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद खर्डा शहरात उमटू लागले आहेत. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपकडून 25 ऑगस्ट 2023 रोजी खर्डा बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी या निवेदनावर भाजपच्या नेत्यांच्या सह्या आहेत.