धक्कादायक : परप्रांतीय कामगारांना मारहाण करून डंपर पेटवला, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल, कर्जत तालुक्यात उडाली खळबळ !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : क्षुल्लक कारणावरून तीन ते चार जणांच्या टोळक्याने परप्रांतीय कामगारांना मारहाण करत डंपर पेटवून देण्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातून उघडकीस आली आहे. ही घटना आढळगाव – रूई गव्हाण परिसरात घडली. या प्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Shocking, Migrant laborers were beaten and dumper was set on fire, Ruigvhan, Aadhalgaon, cases were registered against three for attempting to kill,There was excitement in Karjat taluka, Mirajgaon Police Station,

याबाबत सविस्तर असे की, आढळगाव ते जामखेड या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावर काम करत असलेल्या कामगारांना एका टोळक्याने बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला लघवी केल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली. तसेच डंपर पेटवून देण्यात आला. या घटनेमुळे परप्रांतीय कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

डंपर पेटवून दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी परप्रांतीय कामगार गौतमकुमार उपेंद्र महातो यांनी मिरजगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात साईनाथ जालिंदर ठोकळे,परशुराम चंदर ठोकळे, प्रणव सतिश अल्हाट या तिघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी मिरजगाव व कर्जत पोलिसांची पथके रवाना करण्यात आले आहेत.

परप्रांतीय कामगारांना मारहाण करत डंपर पेटवून देण्याची घटना उघडकीस आल्याने कर्जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून आरोपींच्या अटकेसाठी वेगाने मोहिम राबवली जात असल्याचे बोलले जात आहे.

बाया-माणसे पाहून लघवी करतो का ? असे म्हणत कामगारांना लोखंडी गजाने मारहाण करून त्यांच्या ताब्यातील हायवा गाडी पेटवून देण्याची घटना रविवारी दुपारी १२:१५ च्या सुमारास रुईगव्हाण (ता.कर्जत) येथे घडली.

फिर्यादी गौतमकुमार हा आपला ताब्यातील अशोक लेलंड कंपनीचा हायवा (एमएच २४, एयु ७७०) रुईगव्हाण येथून आढळगावकडे घेऊन जात असताना रुईगव्हाण शिवारातील रुघुवंदन मंगल कार्यालयासमोर रोडवर गौतमकुमार हा लघवी करण्यासाठी खाली उतरला असता परशुराम चंदर ठोकळे आणि प्रणव सतीश आल्हाट (दोघे राहणार रुईगव्हाण ता.कर्जत) त्याच्या जवळ आले. तू बाया माणसे पाहून लघवी करतो का ? असे म्हणत लोखंडी गजाने त्यास मारहाण केली.

याच वेळी साईनाथ जालिंदर ठोकळे हा तेथे आला आणि त्याने फिर्यादी गौतम व साक्षीदार हे तेथुन जाणेसाठी गाडीत बसलेले असताना दोघांना जीवे मारण्याचे उद्देशाने हाईवा गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. यामध्ये सदरच्या हायवा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

गौतम कुमार उपेंद्र महातो (राहणार सट्टा, ता.जि खगडिया, बिहार) याच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध गुरनं २७७/२०२३ अनुसार भादवी कलम ३०७, ४३५, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील अधिक तपास मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे करीत आहे.