खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या जामखेड (Jamkhed) पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना मिळालेली अभिवचन रजा संपवून जेलमध्ये न जाता फरार झालेल्या जामखेड (jamkhed) तालुक्यातील एका आरोपीच्या पुणे परिसरातून मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली आहे. सदर आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टिमचा धडाकेबाज कारवाईचा धडाका सुरूच आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पोलिस स्टेशनला गु र नं .78/2000 भा.द.वि.कलम 302 नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी रामकिसन उत्तम साठे ( रा जवळके ता जामखेड) याला अहमदनगर जिल्हा न्यायालयाने सदरच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. शिक्षा भोगत असताना सदर आरोपी अभिवचन रजेवर आपल्या जवळके या गावी आला होता. अभिवचन रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर न होता फरार झाला होता.त्यावरून येरवडा जेल पोलीसांनी जामखेड पो.स्टे.येथे गु.र.नं.136/2013 भादवि कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता.

जामखेड (jamkhed) न्यायालयाने ठोठावली एक वर्षाच्या कारवासाची शिक्षा

दरम्यान सदर फरार आरोपी हा पुणे परिसरात असल्याची बातमी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना 07 जानेवारी रोजी  गुप्तबातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार सदर आरोपीच्या अटकेसाठी जामखेड पोलिसांचे एक पथक तातडीने पुण्याकडे रवाना झाले होते. जामखेड पोलिसांच्या पथकाने फरार आरोपी रामकिसन उत्तम साठे ( वय 50 वर्ष) यास देहु रोड पोलिसांच्या मदतीने विठ्ठलवाडी, देहूरोड या भागातून अटक करण्यात आली. सदर अटकेतील आरोपीस जामखेड पोलिसांनी जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीस एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांनी बजावलेल्या धडाकेबाज कारवाईच्या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर ,पोलिस नाईक ज्ञानदेव भागवत, पो कॉ शिवलिंग लोंढे, संग्राम जाधव, आबासाहेब आवारे सह आदींचा समावेश होता.