गुड न्यूज : श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गासाठी ४०६ कोटींची तरतुद (Shrigonda-Jamkhed National Highway)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  :  मराठवाड्याला पुण्या मुंबईशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असलेल्या न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड (राज्यमार्ग-५५) या राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला आहे. आता हा मार्ग  राष्ट्रीय महामार्ग ५४८(ड) म्हणुन ओळखला जाईल. या राष्ट्रीय महामार्गाच्या सेक्शन-२ मधील आढळगाव ते जामखेड या ६२.७७५ कि.मी अंतराच्या दुपदरी कामाची इ-निविदा जाहीर झाली आहे. यासाठी ४०६ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यात आमदार रोहित पवारांच्या यश आले. (Good News: Provision of Rs 406 crore for Shrigonda-Jamkhed National Highway)

पंधरा दिवसांपुर्वीच नगर-सोलापुर ५१६ (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात असणारे अडथळे दूर करून या महामार्गाला मंजुरी मिळवली होती आता त्या कामाची ई-निविदा निघाली आहे. पंधरा दिवसांतच दोन्हीही राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची निविदा निघाल्याने  जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. आता या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांची दर्जेदार कामे करून घेण्याची आवश्यकता आहे.

आमदार रोहित पवारांसह सुजय विखेंच्या पाठपुराव्याला आले यश

आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कायम संपर्कात होते. त्यांनी केलेल्या जोरदार पाठपुराव्यामुळे मतदारसंघाला दोन महत्वाच्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले.राज्यमार्ग (क्र.५५) चे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन आता या मार्गाचा राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ (ड)असा सामावेश झाला असुन नव्याने होणारा हा मार्ग १८ महिन्यांच्या कालावधीत पुर्ण होणार आहे. रस्ता झाल्यापासून १० वर्षे त्याच्या डागडुजीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.पुढील काळात या महामार्गांमुळे मोठा कायापालट होईल असा विश्वास आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला.या मार्गासाठी खा.सुजय विखे यांचेही प्रयत्न सुरू होते.