खळबळजनक:जामखेड तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव (Bird flu has spread in Jamkhed taluka)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मागील आठ महिने कोरोनाच्या सावटाखाली गेले आता जामखेडवर आणखीन एक मोठे संकट चालून आले आहे. जामखेड तालुक्यातील मोहा – रेडेवाडी हद्दीत चार पाच दिवसांपुर्वी मृतावस्थेत आढळून आलेल्या कावळ्याचा अहवाल बर्ड प्ल्यू पाॅझिटिव्ह आल्याने जामखेड तालुका हादरून गेला आहे.  संबंधित मृत कावळ्याचा मृत्यू बर्ड प्ल्यूनेच झाला आहे अशी माहिती पशुवैद्यकिय विभागाचे डाॅ गवारे यांनी शनिवारी दिली. बर्ड प्ल्यू रोगाने जामखेड तालुक्यात शिरकाव केल्याचे स्पष्ट होताच मोठी खळबळ उडाली आहे. ( Bird flu has spread in Jamkhed taluka)

जामखेड पासून चार किलोमीटर अंतरावर जामखेड – बीड रोडवरील रेडेवाडी फाट्याजवळ रोड पासून शंभर फूट अंतरावर कावळा आणि कोकीळ पक्षी तडफडून मृत झाल्याची घटना दि 12 जानेवारीला उघडकीस आली होती.  त्याच दिवशी आष्टी – पाटोदा परिसरातील मुगगाव भागात अनेक कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. या कावळ्यांचा मृत्यू बर्ड प्ल्यूने झाल्याचे अहवाल समोर आले होते. त्यानंतर आष्टी व पाटोदा तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान जामखेड तालुक्यातील मोहा व रेडेवाडी हद्दीत कावळा व कोकिळा तसेच अनेक लहान पक्षी मृत आढळून आल्यानंतर वनविभाग व पशुवैद्यकिय विभागाने या ठिकाणी पाहणी करून मृत कावळा तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवला होता. त्या कावळ्याचा मृत्यू बर्ड फल्यूनेच झाल्याचे तपासणीत पुढे आले आहे अशी माहिती पशुवैद्यकिय डाॅ गवारे यांनी दिली. प्रशासनाला सोमवारी अहवाल प्राप्त होईल. दरम्यान पशुवैद्यकिय विभागाने शनिवारी मोहा रेडेवाडी परिसलातील पोल्ट्री फार्म मधून वीस स्वॅबनमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. रविवारीही स्वॅबनमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले जाणार आहेत.

दरम्यान शुक्रवारी जुन्या पंचायत समिती कार्यालय परिसरात एक कावळा तडपडत असल्याचे निदर्शनास आले होते.  संबंधित कावळ्यावर उपचार करून त्याला वनविभागाच्या ताब्यात दिले असे पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ गवारे यांनी सांगितले. शनिवारी जामखेडमधील मिलिंदनगर परिसरात एक जंगली पक्षी एकाच जागेवर बसून आहे.त्याला उडता येत नाही. संबंधित माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वनविभागाला तीनदा कळवली परंतू वनविभागाचा अधिकारी कर्मचारी अजुनही मिलिंदनगर भागात फिरकला नाही.

जामखेडच्या पशुवैद्यकिय विभागात अनेक जागा रिक्त आहेत त्या भरण्यासाठी आता तरी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान कोरोनातून जामखेडकर जनता सावरत नाही तोच आता तालुक्यावर बर्ड प्ल्यूचे संकट घोंघावू लागल्याने जनतेत मोठी खळबळ उडाली आहे. (Sensational: Bird flu has spread in Jamkhed taluka)