भरधाव ट्रॅक्टरने मोटारसायकलला चिरडले, एक जण ठार तर एक जण जखमी (speeding tractor crushed motorcycle,killing one and injuring another)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : भरधाव ट्रॅक्टरने मोटरसायकल चिरडण्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.या घटनेमध्ये एक जण जागीच ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे ही घटना टेंभुर्णी पोलिस स्टेशन हद्दीत घडली. या अपघाताच्या घटनेमध्ये जामखेड तालुक्यातील हळगावमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ( speeding tractor crushed motorcycle, killing one and injuring another)

याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील हळगाव येथील अजिनाथ भानुदास खोटे व उत्तम तात्याबा ढवळे हे दोघे जण मोटारसायकलवर (MH 16 AN 2339)  हळगावहून पंढरपूरला औषधे आणण्यासाठी गेले होते. पंढरपूर येथील जोशी आयुर्वेदिक हाॅस्पीटलमधून मधुमेहाची (शुगर) औषधे घेऊन दोघे सोलापुर – पुणे हायवेवरून गावी परतत असताना करमाळा ब्रीज खालून जाण्याऐवजी चुकून कुर्डूवाडी ब्रीज खालून कुर्डूवाडी रोड बरेच पुढे गेले. बर्याच वेळानंतर रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले. परत गाडी वळवून गावाकडे निघाले असता पाठीमागुन भरधाव आलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरने (MH 45 S 3129) मोटारसायकलला चिरडले. या अपघातात अजिनाथ खोटे (वय 69) हे जागीच ठार झाले तर उत्तम ढवळे (वय65) हे जखमी झाले. त्यांच्यावर टेंभुर्णी येथील पाटील हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना कुर्डूवाडी- टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावच्या शिवारात शनिवारी 16 रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. (speeding tractor crushed motorcycle, killing one and injuring another)

याप्रकरणी मयत अजिनाथ खोटे यांचा मुलगा संभाजी खोटे याने टेंभुर्णी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक नवनाथ आगतराव माळी (रा परिते, ता माढा, जि सोलापूर) याच्याविरोधात कलम 304 (अ), 279, 337,338,427, व मोटार वाहन कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलिस करत आहेत.

दरम्यान अजिनाथ खोटे यांच्या निधनामुळे हळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. अजिनाथ खोटे हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्यावर रविवारी सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात हळगाव येथील तुकाईवस्ती परिसरातील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. खोटे यांच्या पश्चात दोन मुले, मुली, पत्नी, सुना नातवंडे असा परिवार आहे.