World Cup 2023 schedule : मोठी बातमी ! विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत विरुद्ध पाकिस्तान या दिवशी होणार पहिला सामना
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ICC World Cup 2023 Schedule : संपुर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेल्या वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे.आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यंदा भारतात होणार आहे.विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मुख्य सामन्यांसाठी 10 तर राखीव सामन्यांसाठी 2 अश्या 12 शहरांची निवड करण्यात आली आहे.ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळात खेळवली जाणार आहे.
भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांच्या ठिकाणावरून पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. यामुळे बराच गदारोळ उठला होता.परंतू बीसीसीआयच्या रेट्यापुढे पाकिस्तानला नमते घ्यावे लागले. ठरल्याप्रमाणे पाकिस्तानचे सामने होणार आहेत. अहमदाबाद, बंगळूरू, हैदराबाद,चेन्नई आणि कोलकाता या पाच ठिकाणी पाकिस्तानचे सामने होणार आहे. पाकिस्तानचा भारताबरोबर पहिला सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.
विश्वचषक 2023 स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. 46 दिवस चालणारी ही स्पर्धा हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या दहा मैदानावर खेळवली जाणार आहे. हैदराबाद व्यतिरिक्त गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम येथे 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत सराव सामने होणार आहेत.
पहिला उपांत्य फेरीचा सामना बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत आणि दुसरा उपांत्य फेरीचा सामना दुसऱ्या दिवशी कोलकाता येथे होईल. दोन्ही उपांत्य फेरीत राखीव दिवस असेल.अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल आणि 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस असेल.