राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जाणार असल्याच्या वृत्तावर अजित पवारांचा मोठा खुलासा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी आज सत्ताधाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. राज्यात अतिवृष्टी झालेल्या विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच वेगवेगळ्या विषयांवर शिंदे – फडणवीस सरकारवर अजित पवार यांनी जोरदार हल्ला चढवला.ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील आमदार आणि माजी आमदारांना आपल्या गळाला लावण्याची मोहीम उघडली आहे, याच मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन दादा शिंदे आणि मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील हे दोघे भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आज समोर आले होते. यावर विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी मोठा खुलासा केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये असल्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. तसेच एका कामाच्या निमित्ताने बबनदादा शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले असल्याचा दावा अजित पवार यांनी यावेेळी केला.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय : एकापेक्षा अधिक मतदारसंघात नाव असलेल्या मतदारांना बसणार चाप, 1 ऑगस्टपासून मतदानकार्ड जोडणार आधारकार्डशी – श्रीकांत देशपांडे

याबाबत सविस्तर माहिती देताना अजित पवार म्हणाले की, बबनदादा शिंदे हे भाजपात जाणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी चालवली होती. मात्र आता आमची बैठक सुरू असतानाच आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बबनदादांचा फोन आला. काही कामाच्या संदर्भात भेटायला आलो होतो, असे त्यांनी सांगितले. बबनदादांचे दिल्लीतही कारखाने आहेत. त्यांची इतर पण महत्त्वाची कामं असतात, असे अजित पवार म्हणाले.

तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागते, त्याचे वेगळे अर्थ काढणे योग्य नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, मीसुद्धा उपमुख्यमंत्री होतो. तेव्हा भाजपाचे खासदार आमदार मला भेटायला याचचे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे असतात. आम्हीही भेटायला जातो. पण आम्ही कुठे गेलो काय. बबनदादा हे कामाच्या संदर्भात फडणवीसांना भेटले, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या दोघांच्या हाती काही आहे, असं वाटत नाही. यांना दिल्लीत जाऊन तिकडून हिरवा झेंडा मिळत नाही तोपर्यंत हे काही करू शकत नाहीत असं चित्र दिसतंय, असे अजित पवार म्हणाले.

शेतकरी पती-पत्नीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू , शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथील घटना

अतिवृष्टी झालेल्या विभागात ओला दुष्काळ जाहीर करा – अजित पवार

दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच अतिवृष्टी व पूरामुळे शेतजमिन आणि पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावे अशी मागणी करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला

यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेस आमदार हसन मुश्रीफ आमदार धनंजय मुंडे सह राष्ट्रवादीचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते.