शिवसेना आणि काँग्रेसला एकनाथ शिंदे गटाकडून मोठा दणका, मराठवाड्यातील बडा नेता शिंदे गटात दाखल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेना कोणाची याचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. शिवसेना आपल्याच ताब्यात राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शिंदे गटाला अनेकांचा पाठिंबा मिळावा यासाठी राज्यामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला मोठा वेग आला आहे. शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते नगरसेवक व मोठे नेते शिंदे गटात दाखल होत असतानाच इतर पक्षातील नेते सुद्धा आता शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. शिंदे गटाच्या मजबुतीसाठी शिंदे गटात अनेक नेते कार्यकर्ते दाखल होत आहेत. शिंदे गटाने शिवसेनेला मोठे हादरे देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसलाही शिंदे गटाने मोठा हादरा दिला आहे.

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या कारखान्याची मालमत्ता ईडीने नुकतीच जप्त केली होती. ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे खोतकर हे कोणत्या क्षणी शिंदे गटात जाणार असे बोलले जात होते, मात्र शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेमध्ये माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपण शिवसेनेतच असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी गद्दारी करणार नाही असे भाषण केले होते मात्र आता खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचे स्पष्ट होत आहे.

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ही भेट महाराष्ट्र सदनात झाली आहे. या भेटीचा सविस्तर तपशील मात्र अद्यापही समोर आलेला नाही. काहीही झालं तरी शिवसेना सोडणार नाही अशी गर्जना करणारे शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर हे सुद्धा आता शिंदे गटात दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे, त्यामुळे मराठवाड्यात शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसला शिंदे गटाने  मोठा हादरा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अरुण सावंत हेही आता शिंदे गटात दाखल झाले आहेत. रविवारी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अरुण सावंत यांनी दहिसर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

शिवसेना कोणाची हा फैसला निवडणूक आयोगाच्या कोर्टात होणार आहे आठ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील पुरावे सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहेत. तत्पूर्वी दोन्ही गटांकडून पक्ष संघटनेत सर्वाधिक ताकद कोणाची याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्याच अनुषंगाने दोन्ही गटाकडून फोडाफोडीच्या खेळ्या वेगाने राबवल्या जात आहेत. यात कोण बाजी मारणार हे आता येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.