ऊसतोड मुकादमास लुटणारी टोळी गजाआड, 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहमदनगर LCB ची धडक कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ऊसतोड मुकादमास लुटणाऱ्या टोळीस बेड्या ठोकण्याची धडक कारवाई अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पार पाडली. याप्रकरणात 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत चौघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पुण्याहून अहमदनगरमार्गे पाथर्डीला मोटारसायकल वरून जात असलेल्या एका ऊसतोड मुकादमाला लुटण्याची घटना मागील महिन्यात घडली होती. ही घटना पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात घडली होती.

स्कॉर्पिओतून पाळत ठेवून आलेल्या लुटारूंनी ऊसतोड मुकादम संतोष शहादेव बर्डे आणि त्यांचे भाऊ बबन बर्डे यांच्या मोटारसायकलला स्कॉर्पिओ गाडी आडवी लावत करंजी घाटात लुटले होते. या लुटीत बर्डे यांच्याकडील सात लाखांची रक्कम लुटून नेण्यात आली होती.

याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाथर्डी पोलिसांसह एलसीबीकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. LCB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हा गुन्हा पप्पू दराडे उर्फ प्रवीण दिलीप दराडे, अंबादास नारायण नागरे, तात्याबा पोपट दहिफळे, दत्तू बाबा सातपुते यांनी केल्याचे समजले. त्यानुसार एलसीबीने छापेमारी करत चौघांना मोठ्या शिताफीने अटक केली.

LCB ने अटक केलेल्या चौघा आरोपींकडून रोख 5 लाख रूपये, गुन्ह्यात वापरलेले स्कॉर्पिओ, मोबाईल असा एकुण 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पुढील तपासासाठी आरोपींना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली. या पथकात सोपान गोरे, मनोहर शेजवळ, संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, संतोष लोढे, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, दीपक शिंदे, विश्वास बेरड, योगेश सातपुते, सागर ससाणे आदींचा समावेश होता.