बिग ब्रेकिंग : राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप, आमदार शिंदेसह माजी आमदार पाटील भाजपच्या वाटेवर, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पडले भगदाड ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात सत्तांतरानंतर आता पक्षांतराची मोठी लाट सक्रिय झाली आहे. शिवसेनेतील अनेक नेते शिंदे गटात दाखल होत असतानाच आता भाजपनेही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला टार्गेट करण्याची मोहिम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीला पहिला मोठा हादरा पश्चिम महाराष्ट्रात बसला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात भाजप यशस्वी होत असल्याचे आता स्पष्ट होत आहे माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे दोन्ही मोठे भाजपच्या गळाला लागले आहेत.

बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या दोन्ही नेत्यांचा भाजपातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पुढील विधानसभा- लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील विविध भागात राजकीय मेगाभरतीचं लक्ष्य ठेवलं आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपने राष्ट्रवादीला सोलापुर जिल्ह्यात मोठे भगदाड पाडले आहे. माढ्यामधून शरद पवार हे खासदार झाले होते, त्यामुळे माढा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड आहे. मात्र आता याच मतदारसंघातून राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.

माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. बबन शिंदे आणि राजन पाटील हे सोलापूरमधले राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. आज दिल्लीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी याबाबत मध्यस्थी केली.राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजप दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. दोन महिन्यांपूर्वी बबन शिंदे यांना ईडीची नोटीस आली होती. हे काही भाजपवरच प्रेम नाही तर दबावामुळे आमदार भाजपमध्ये जात असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे.