सांगलीच्या म्हैसाळ सामुहिक आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा : गुप्तधनाच्या लालसेतून 9 जणांची हत्या, दोन भोंदूबाबांना अटक !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रासह देशात खळबळ उडवून देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ सामुहिक आत्महत्या प्रकरणात सांगली पोलिसांकडून अतिशय धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. म्हैसाळमधील त्या 9 जणांनी आत्महत्या केली नसून जेवणात विष कालवून त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. म्हैसाळ प्रकरणात नवा खुलासा झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ या गावातील अंबिकानगर भागात राहणा रेपशुवैद्यकीय डॉक्टर माणिक येल्लाप्पा वनमोरे (49), आक्काताई वनमोरे (72), रेखा माणिक वनमोरे (45), प्रतिभा वनमोरे (21),आदित्य वनमोरे (15), शिक्षक पोपट येल्लाप्पा वनमोरे (52), अर्चना वनमोरे (30), संगीता वनमोरे (48), शुभम वनमोरे (28) या एकाच कुटुंबातील 9 जणांचे 20 जून 2022 रोजी मृतदेह घरात आढळून आले होते.

म्हैसाळमधील 9 जणांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. या घटनेचा तपास करणाऱ्या सांगली पोलिसांनी केलेल्या वेगवान तपासात सावकाराच्या जाचाला कंटाळून त्या 9 जणांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातूून समोर आले होते. या प्रकरणी सांगली पोलिसांकडून 25 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच 13 जणांना अटकही करण्यात आली होती.

दरम्यान या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली नसून त्या सर्वांची गुप्तधनाच्या लालसेतून जेवणात विष घालून हत्या करण्यात आल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात आब्बास महमंदअली बागवान वय ४८ वर्षे रा. मुस्लीम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर सोलापुर आणि धीरज चंद्रकांत सुरवशे वय ३० वर्षे रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं ५९ जुना पुणा नाका, सोलापूर या दोघा भोंदूबाबांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या दोघा भोंदूबाबांच्या वनमारे बंधूंशी नेहमी भेटी होत असायच्या, गुप्तधनाच्या लालसेपोटी वनमारे बंधू अटकेतील भोंदूबाबांच्या नादी लागले होते. त्यांच्याच पैश्यांची देवाणघेवाण व्हायची, दरम्यान घटनेच्या आदल्या रात्री (19 जून 2022) दोघे भोंदूबाबा म्हैसाळला येऊन गेल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. तेव्हापासून पोलिस त्यांच्या मागावर होते. अखेर त्या दोघांना बेड्या ठोकण्यात सांगली पोलिसांना यश आले.

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या म्हैसाळ प्रकरणाचा वेगाने तपास करून या प्रकरणाचे खरे सत्य उघडकीस आणण्याचे अव्हानात्मक काम सांगली पोलिसांनी अवघ्या आठ दिवसात पुर्ण केले. या प्रकरणातील दोघा मुख्य आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे सांगली पोलिस दलाचे राज्यात कौतुक होत आहे.

ही कारवाई अप्पर अधिक्षक मनिषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक अशोक विरकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अजय सिंदकर, सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, भगवान पालवे, उप निरीक्षक विशाल येळेकर, संदिप गुरव, संजय कांबळे, प्रशांत माळी, संदिप नलवडे, सचिन कनप, नागेश खरात, विक्रम खोत यांनी पार पाडली.