Nitin Desai Death Reason : कर्जतच्या ND Studio मधून व्हाईस रेकॉर्डर जप्त, पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे धागेदोरे, व्हाइस क्लीपमध्ये चार उद्योजकांची नावे, कोण आहेत ते चार उद्योजक ?

Nitin Desai Death Reason : मराठीसह हिंदी चित्रपटांचे कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आज पहाटे तीन ते चारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत.पोलिसांनी घटनास्थळाहून व्हाईस रेकॉर्डर (Vice Recorder) जप्त केले आहे. यात चार उद्योजकांची नावे असल्याची माहिती समोर येत आहे.ते चार उद्योजक कोण ? याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.(Nitin Chandrakant Desai Suicide case)

दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली असावी याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच आता या घटनेमध्ये मोठी माहिती समोर आली आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हाइस रेकॉर्डमध्ये व्हाइस रेकॉर्ड करून काही क्लीप तयार केल्या होत्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील चार उद्योजकांची नावे असल्याची माहिती समोर येत आहे.

nitin desai death reason : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या ?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या तोडीस तोड आपल्याकडेही फिल्म स्टुडिओ असावा असा आग्रह धरलेल्या कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमध्ये एनडी स्टुडिओ नावाने स्टुडिओ उभारला होता. हा स्टुडिओ उभारणीसाठी त्यांनी काही कर्जही घेतली होते. त्या कर्जाची रक्कम सध्या 249 कोटी एवढी आहे. हे कर्ज त्यांच्या पत्नीच्या नावाने घेतल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

nitin desai death reason, vice recorder seized from ND Studio Karjat, important threads in hands of police, names of four entrepreneurs in vice clip, who are those four entrepreneurs?,

Nitin Desai दिल्लीहून रात्रीच परतले होते

मिळालेल्या माहितीनुसार, कलादिग्दर्शक नितीन देसाई हे काल रात्रीच दिल्लीहून मुंबईला पोहचले होते. मुंबईहून ते एनडी स्टुडिओमध्ये मध्यरात्री दोन वाजता पोहचल्यानंतर त्यांनी तेथील मॅनेजरला आपण तुला सकाळी काही क्लीप देईल त्या तू ठराविक व्यक्तींकडे त्या दे असे त्यांनी म्हटले होते. एकुणच नितीन देसाई यांनी आत्महत्येचे रात्रीपासूनच ठरवले होते एवढे मात्र खरे.

ते चार उद्योजक कोण?

नितीन देसाई यांनी व्हाइस क्लीपमध्ये आपल्याला मानसिक त्रास देणाऱ्या चार उद्योजकांची नावे असल्याची माहिती समोर येत आहे. तेव्हा ते चार उद्योजक कोण?असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला असून,पोलीस त्या दिशेने आता तपास करीत आहेत.

सायंकाळपर्यंत होऊ शकतो गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी एनडी स्टुडिओ गाठला असून, नितीन देसाईंचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून खालापूर पोलीस स्टेशनमध्ये प्रथमतः आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर घटनेचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम, सायबर फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड टीम घटनास्थळी पोहचल्याची माहिती त्यांनी दिली असून, ते तपास करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. तर याप्रकरणाता आज सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

नितीन देसाई यांचा जन्म दापोलीतला. देसाई यांचे शालेय शिक्षण वामनराव मुरंजन हायस्कूल, मुलुंडमधून मराठी माध्यमात झालं, चित्रपटात येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतल्या जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि LS रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं होतं. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. मे १९८७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुंबईतल्या फिल्मसिटी स्टुडिओला भेट दिली आणि लगेचच स्टिल फोटोग्राफीच्या २-डी फॉरमॅटमधून कला दिग्दर्शनाच्या ३-डी विश्वाकडे ते वळले. गोविंद निहलानी दिग्दर्शित तमस या टीव्ही मालिकेसाठी ते प्रसिद्ध कला दिग्दर्शक, नितीश रॉय यांच्यासोबत चौथे सहाय्यक म्हणून सामील झाले. त्यावेळी त्या टिव्ही सिरीयलच्या सेट वर देसाई १३ दिवस ,१३ रात्र राहिले होते. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, जर तमसच्या सेटवर मी १५ मिनिट अंघोळीला गेलो तरी वेळ वाया गेल्याचे दुख व्हायचे. त्यांच्या या विधानावरून कला दिग्दर्शक म्हणून त्यांची कामावर किती श्रद्धा होती हे आपल्या लक्षात येईलचं.

नितीन देसाई यांनी टीव्ही वरील कबीर,चाणक्य या मालिकेत पहिल्या २५ भागांसाठी साडेपाच वर्षे काम केले आणि २६ व्या भागापासून स्वतंत्रपणे काम करायला सुरूवात केले.त्यांची पहिली फिचर फिल्म १९९३ मध्ये अधिकारी ब्रदर्स यांची भुकॅम्प होती. मात्र विधू विनोद चोप्राच्या १९४२ : ए लव्ह स्टोरी या पीरियड फिल्मने नितीन देसाई यांना प्रकाशझोतात आणले. त्यानंतर २००५ मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे एनडी स्टुडिओ सुरु केला. हा स्टुडिओ तब्बल ५२ एकरच्या परिसरात पसरलेला आहे. यांच स्टुडिओतील साहित्यांच्या माध्यामातून गेली ३ वर्ष नितीन देसाई हे लालबागच्या राजाच्या मंडपासाठी डेकोरेशन करायचे. तसेच १ मे २०२२ रोजी त्यांनी हा स्टुडिओ सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी मोफत उपल्बध करून दिला होता.

नितीन देसाई यांनी परिंदा, खामोशी, माचीस, बादशाह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजू चाचा, सलाम बॉम्बे यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये काम केले आहे. तसेच स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी त्यांनी दोन सेट देखील डिझाइन केले होते. त्याचबरोबर हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ ,प्रेम रतन धन पायो या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. अनेक शिवकालीन मालिकांचे कला दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. नितीन देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलायं.

मराठीत त्यांनी बालगंधर्व या बायोपिक चित्रपटाची निर्मिती केली. तसेच मराठी पाऊल पडते पुढे या रिअॅलिटी टीव्ही शोची निर्मितीही देसाई यांनी केली होती. त्याचबरोबर २०११ मध्ये, त्यांनी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हॅलो जय हिंद या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केलं होतं. त्यानंतर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला होता.

मात्र मध्यांतरी मे महिन्यात एका जाहिरात संस्थेने देसाई यांच्यावर ५१.७ लाखची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. एजन्सीने तीन महिने काम करूनही देसाई यांनी पैसे दिले नसल्याचे सांगितले होते. मात्र, नितिन देसाई यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. यापूर्वीही एजन्सीने आपल्यावर असेच आरोप केले होते, असे ते म्हणाले होते.

दरम्यान ठराविक मुदतीमध्ये घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज न फेडल्यामुळे नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाई होणार असल्याचे चित्र मध्यांतरी निर्माण झालं होतं. नितीन देसाई यांनी काही कारणांनी CFM या वित्तीय संस्थेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१६ आणि २०१८ मध्ये दोन वर्षात कर्जाचा करार नामा झाला होता. यासाठी देसाई यांनी विविध सर्व्हेनंबर असलेल्या तीन मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. काही कालावधीनंतर CFM या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते EARC कंपनीकडे सोपवली. परंतु कर्जाची वसुली होत नव्हती. १८० कोटी रुपयांचे कर्ज देसाई यांनी घेतले होते. मात्र व्याजासह ३ मे २०२२ पर्यंत कर्जाची रक्कम सुमारे २४९ कोटी रुपयांवर पोचल्याची माहिती आहे.

संबंधित वित्तीय संस्थेने वसुलीसाठी तगादा लावला मात्र देसाई यांच्याकडून कर्जाची रक्कम भरली गेली नाही. कर्जाऊ दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक होतं. त्यानुसार त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला. त्याला आता सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सध्या हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याचे कळते. त्यामुळे देसाई यांनी आर्थिक कारणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगताना दिसत आहे. दरम्यान आर्थिक चणचण भासल्यामुळे किंवा वैद्यकीय समस्येमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप त्यांचे आत्महत्यामागे काय कारण हे समजू शकले नाही.

दरम्यान देसाई यांच्या आत्महत्येबद्दल बोलताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंनगटीवार म्हणाले की, सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी खूप धक्कादायक आहे. कल्पकतेने नविनतम कलाकृती सादर करण्याची ईश्वरीय देणगी लाभलेल्या या गुणी व्यक्तिमत्वाची अशी “एक्झिट” संपूर्ण मनोरंजन आणि कला क्षेत्राचीच हानी आहे.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना मरीन लाईन्स येथे आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम व्यवस्थेचे यशस्वी संयोजन नितीन देसाई यांनी केले होते. हा हरहुन्नरी कलावंत असा अचानक आपल्याला सोडून जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती.

तसेच नितीन देसाई यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या अल्पबजेट सिनेमासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना आपला ND स्टुडिओ कमी शुल्कात उपल्बध करून दिला होता. त्यामुळे माध्यामांवर बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, नितीन हा माझा जवळचा मित्र होता. त्यामुळे त्यांने उचललेल्या पाऊलामुळे सर्वांनाच धक्का बसलायं. त्यामुळे आयुष्यात संकटाच्या वेळी उभा राहतो. तोच खरा मित्र हे पुन्हा एकदा खरे ठरले आहे.