जामखेड पाठोपाठ अरणगाव परिसरात भरदिवसा घरफोडी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील भरदिवसा चोरीची घटना ताजी असतानाच, आता अरणगावमधून भरदिवसा घरफोडीची घटना समोर आली आहे.या घटनेत 32 हजाराच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला.या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घरफोडीची घटना घडल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर असे की,जामखेड तालुक्यातील अरणगाव गावातील गर्जे वस्तीवरील आप्पासाहेब रामदास निगुडे (वय 40 वर्ष) यांच्या घरी भरदिवसा घरफोडीची घटना घटना आज 13 रोजी घडली.आप्पासाहेब निगुडे हे आज सकाळी 11 वाजता जनावरांना गवत आणण्यासाठी आपल्या शेतात गेले होते,तर घरातील इतर लोक शेतात कांदा खुरपण्यासाठी गेले होते.दुपारी 1 वाजेच्या सुमारास निगुडे हे गवत घेवुन घरी आले.पाणी पित असताना त्यांना घराच्या दोन्ही दरवाजांना कुलूप दिसले नाही.

जाहिरात

निगुडे यांनी घरात जावुन पाहिले असता घरामध्ये सामानाची उचकापाचक झालेली त्यांना दिसली.यावेळी त्यांनी देवघरात ठेवलेल्या पैश्यांचा डबा पाहिला असता तो मिळून आला नाही. या घटनेत निगुडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी निगुडे यांच्या घरातून 32 हजार रूपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले.

दरम्यान, या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात निगुडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात कलम 354 आणि 380 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.