जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बुधवारी सायंकाळी जामखेड तालुक्यातील 3 गावांमध्ये विजा कोसळण्याच्या घटना घडल्या. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात विजा पडून चार जनावरांचा मृत्यू झाला आहे.जामखेड तालुक्यातील ज्या भागात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे अश्या नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने हाती घेतले जाणार आहेत, अशी माहिती तहसीलदार गणेश माळी यांनी दिली.
राज्यात एकिकडे उष्णतेची लाट सक्रीय असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे.विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर विज पडून जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत. तर काही ठिकाणी जिवीत हानी होत आहे. आत्मानंद संकटामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
बुधवारी सायंकाळी जामखेड तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुसडगांव, भुतवडा, जवळके या भागांत विज कोसळून चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी साकत येथे विज पडुन एका बैलाचा मृत्यू झाला होता. जामखेड तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. पाऊस कमी पण नुकसान जास्त अशी स्थिती आहे. दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या जामखेडकरांना अवकाळी पावसामुळे कुठलाच दिलासा मिळालेला नाही.
कुसडगांव येथे सायंकाळी 4:45 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी बिभीषण रामचंद्र भोरे यांच्या गायीचा वीज कोसळून मृत्यू झाला. तर भुतवडा येथील उध्दव पांडुरंग डोके यांच्या गायीचे वासरू वीज कोसळून मयत झाले. तर जवळे गावात दोन ठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडली. यात अंकुश वाळूंजकर यांची गाय तर दादासाहेब पांडुरंग हाडोळे यांचा बैल मरण पावला. या घटनांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात मंगळवारी व बुधवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी जामखेड तालुक्यात पडलेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे विशेषता: फळबागांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने हाती घेतले जाणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश माळी यांनी दिली.