जामखेडमध्ये भरदिवसा चोरी, शहरात चोरटे पुन्हा सक्रीय

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाले आहेत. शिक्षक काॅलनीतील एका माजी सैनिकाच्या घरात भरदिवसा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणात सुमारे 90 हजाराचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Broad day theft in Jamkhed, thieves active again in the city

याबाबत सविस्तर असे की, जामखेड शहरातील शिक्षक काॅलनी परिसरात बजरंग तुळशीराम डोके वय-58 या माजी सैनिकाचे घर आहे. डोके यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडला असल्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्याने डोके यांच्या घरातील बेडरुमधील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिण्यांचा ऐवज लंपास केला. ही घटना 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 3 यावेळेत घडली.

माजी सैनिक बजरंग तुळशीराम डोके यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे 90 हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती आणि पोलिस नाईक अजय साठे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली.

दरम्यान बजरंग तुळशीराम डोके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात कलम 380 नुसार जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे पुढील तपास करत आहेत.