… तर जामखेड महावितरण कार्यालयासमोर जनावरे आणून बांधू – प्रशांत शिंदे यांचा इशारा, रास्ता रोको अंदोलनाच्या दणक्यानंतर महावितरणला आली जाग, प्रशांत शिंदेंनी गाजवले रास्ता रोको अंदोलन !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : जवळा गावातील विजेच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या जवळा ग्रामपंचायतने गुरूवारी महावितरण विरोधात रास्ता रोको आंदोलन हाती घेतले होते. या अंदोलनात युवा नेते प्रशांत शिंदे यांनी महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात जोरदार हल्लाबोल चढवला. शिंदे यांनी शेतकरी बांधवांच्या बाजूने अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडली. प्रशांत शिंदे यांनी आजचे अंदोलन गाजवले.जवळा ग्रामपंचायतने हाती घेतलेल्या रास्ता रोको अंदोलनाच्या दणक्यानंतर महावितरणला जाग आली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको अंदोलन मागे घेण्यात आले.
महावितरणच्या गलथान कारभाराचा मोठा फटका जवळा परिसरातील शेतकरी व नागरिकांना बसत आहे. यामुळे जनतेत संतापाचे वातावरण आहे. जवळा गावातील महावितरणच्या विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी जवळा ग्रामपंचायतने रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार आज 13 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, समतानगर, जवळा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन पार पडले. तब्बल एक तास हे अंदोलन सुरू होते.
“यावेळी अनेकांनी महावितरणच्या मनमानी व गलथान कारभाराविरोधात जोरदार समाचार घेतला. विशेषता: भाजपाचे युवा नेते प्रशांत शिंदे यांनी महावितरण विरोधात जोरदार हल्लाबोल चढवला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकरी बांधव व नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा पाढाच त्यांनी अतिशय आक्रमकपणे यावेळी मांडला.जवळा सबस्टेशन् अंतर्गत येणाऱ्या कृषी वहिनी वरील LT लाईन Main Line चे पोल, वादळी वाऱ्यामुळे पडझड झाली होती, तारा तुटल्या आहेत, ते तत्काळ दुरुस्त करण्यात याव्यात , त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचा पिण्याचा प्रश्न सुटेल, अशी आग्रही मागणी यावेळी युवा नेते प्रशांत शिंदे यांनी यावेळी बोलताना केली.”
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष आव्हाड, सरपंच सुशिल आव्हाड, माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, सावता हजारे, सुभाष रोडे, जेष्ठ नेते मुरलीधर (आण्णा) हजारे, संतराम सुळ, ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल महारनवर, कल्याण आव्हाड, प्रेम आव्हाड, युवा नेते अमोल हजारे, माजी ग्रामपंचायत सदस्या आरती दिपक देवमाने, महावीर पोफळे, राहुल मासुळे, दत्ता रोडे, किसन गोयकार, वैभव खोले, राहुल लेकुरवाळे, मिलिंद आव्हाड, सचिन विटकर, तुषार काढणे,बंडू वाळुंजकर, नाना कोल्हे, मंगेश रोडे, मतेवाडी सरपंच तात्या कसरे, बोरला गावचे मा सरपंच कृष्णा चव्हाण सह जवळा, गोयकरवाडी, बोर्ले येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याद राखा गाठ माझ्याशी – प्रशांत शिंदेंचा हल्लाबोल
परमीटच्या नावाखाली मनमानीपणे वीज बंद ठेवली जाते. त्यामुळे जवळा गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.परमीट देताना नागरिकांना माहिती देणे आवश्यक आहे. महावितरणने शेड्यूल ठरवायला हवे.त्याचबरोबर महावितरणची जी मनमानी सुरू आहे ती तातडीने थांबवा, महावितरणकडे आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या तातडीने मार्गी लावाव्यात. महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जो मनमानी कारभार सुरु आहे तो न थांबल्यास त्याचबरोबर आम्ही केलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास जामखेड महावितरण कार्यालयासमोर जनावरे आणून बांधून आमरण उपोषण हाती घेतले जाईल असा इशारा यावेळी बोलताना युवा नेते प्रशांत शिंदे यांनी दिला.
शिंदे पुढे म्हणाले की, ग्रामदैवत जवळेश्वराची रथयात्रा जवळ आली आहे. रथमार्गावर महावितरणचे अनेक गाळे खाली आहेत. यात्राकाळात मोठी दुर्घटना घडू नये यासाठी हे गाळे तातडीने वर घ्यावेत जेणेकरून रथयात्रा उत्सव निर्विघ्नपणे पार पडेल. महावितरणने रथ मार्गावरील गाळे वर ओढले नाहीत आणि त्यामुळे जर एखादी दुर्घटना झाली तर त्याला महावितरण सर्वस्वी जबाबदार असेल. तुमच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास जवळा ग्रामस्थ मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा यावेळी शिंदे यांनी महावितरणला दिला.
शेतकऱ्यांना आणि जवळा गावातील नागरिकांना कोणी वाली नाही असे समजू नका, यापुढे महावितरणने मनमानी कारभार न थांबवल्यास गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला वठणीवर आणण्यासाठी आक्रमक अंदोलन हाती घेतले जाईल, त्यावेळी जे काही होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असेल असा गंभीर इशारा यावेळी प्रशांत शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला.
रास्ता रोको आंदोलनानंतर महावितरणला आली जाग
महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक झालेल्या जवळा ग्रामस्थांनी हाती घेतलेल्या रास्ता रोको अंदोलनानंतर महावितरणला जाग आली. विजेच्या विविध प्रश्नांसंबंधी जवळा ग्रामपंचायतने केलेल्या मागण्यांवर जामखेड महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांनी लेखी अश्वासन दिले. रास्ता रोको अंदोलनात अनेकांनी महावितरणच्या कारभारावर सडकून टीका केली. युवा नेते प्रशांत शिंदे यांनी आक्रमकपणे मांडलेली भूमिका चर्चेत आली आहे. माजी सभापती सुभाष आव्हाड, दिपक देवमाने, सावता हजारे, आरती देवमाने, कृष्णा चव्हाण सह आदींनी आपली भूमिका मांडली.महावितरणच्या लेखी अश्वासनानंतर अंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोको अंदोलनावेळी जामखेड – करमाळा मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.
रास्ता रोको अंदोलनावेळी महावितरणच्या वतीने जामखेड महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर, सहाय्यक अभियंता राजुळे, प्रभारी सहाय्यक अभियंता महेश पवार नान्नज कक्ष उपस्थित होते. त्यांनी अंदोलकांच्या भावना समजून घेतल्या. अंदोलनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जामखेड पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, हेड कॉ. संजय लोखंडे, हृदय घोडके, पो.कॉ अमोल आजबे, योगेश दळवी, दत्तू बेलेकर गोपनीय शाखा अविनाश ढेरे,यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
महावितरणच्या लेखी आश्वासनात काय म्हटलंय ?
१) पावसाळ्यापूर्वीचे जवळा सबस्टेशन मेंटेनन्सची बरेचशी कामे झालेली असून उर्वरित कामे एजन्सीद्वारे करून घेण्याचे कामे चालू आहे.
२) मान्सून पूर्व झालेल्या वादळी पावसामुळे वादळात झालेल्या पोलची पडझड व तुटलेल्या तारांची दुरुस्ती कंपनीच्या कर्मचा-यामार्फत वेळेत करून घेण्यात आलेल्या असून उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना कर्मचारी व खाजगी एजन्सीला देण्यात आलेल्या आहेत.
३) ३३ केव्ही खर्डा लाईनचे कायमस्वरुपिचे दुरुस्ती कामे करण्याच्या सूचना खाजगी एजन्सी व जनमित्र कर्मचा-यास देण्यात आलेल्या आहेत.
४) मा. कार्यकारी अभियंता कर्जत यांनी दि.१२.०६.२०२४ रोजीच्या जामखेड उपविभागातील बैठकीनुसार मेटेनन्सची कामे करण्यासाठी ४-५ ठेकेदारांची नेमणूक केली असल्याचे सांगितले आहे.
५) नान्नज कक्ष कार्यालयास कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता मिळणेकरीता या कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
६) बाजारतळातील मेनलाईनचे नदीच्या कडेस शिफ्ट करण्यासाठी कंपनीच्या नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
७) जवळा सोसायटी समोरील मेन लाईन व एल टी लाईनचे गाळे दुरुस्त करण्याचे काम एजन्सी मार्फत करून देण्यात येईल.
८) मंदिर परिसरातील डी.पी. शिफ्टिंगचे काम कंपनीच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
९) जवळेश्वर यात्रेपूर्वी गावठाणातील गाळ्याची उंची एजन्सीमार्फत वाढवण्यात येईल.
या मागण्यांसाठी झाले रास्ता रोको अंदोलन
१. पावसाळ्यापूर्वीची Maintenance ची कामे करावीत.
२. वादळात झालेल्या पडझडीत पडलेल्या पोलचे व तुटलेल्या तारांची दुरुस्ती करून घ्यावीत.
3. 33 KV खड़ी लाईन चे कायमस्वरूपीचे दुरुस्ती कामे करावीत.
४. MSEB ची Maintenance ची कामे करण्यासाठी आणखीन २-३ ठेकेदारांची नेमणूक करावी.
५ . जवळा सबस्टेशनला कायमस्वरूपी जुनियर अभियंता नेमणूक करावी.
६. बाजार तळातील मेन लाईन नदीच्या कडेस शिफ्ट करण्यात यावे.
७. जवळा सोसायटी समोरील मेन लाईन वा लाईन चे गाळे दुरुस्त करण्यात यावेत.
८. सावतामाळी मंदिर परिसरातील DP शिफ्ट करण्यात यावी.
९.जवळेश्वर यात्रेपूर्वी गावठाणातील गाळ्यांची उंची वाढवण्यात यावी व दुरुस्त करावी