वाळू तस्करांविरोधात जामखेड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई !

जामखेड तालुक्यातील अवैध्य व्यवसायिकांसह वाळूतस्कराविरोधात आक्रमक झालेल्या पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या पथकाला रविवारी पहाटे मोठी कारवाई करण्यात मोठे यश आले आहे. जामखेड पोलिसाच्या पथकाने आजवरच्या सर्वात मोठ्या कारवाईला अंजाम देण्याची कामगिरी बजावली आहे. तब्बल 45 लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्याच्या कारवाईमुळे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या पथकाचे तालुक्यातून आता कौतुक होऊ लागले आहे.

जामखेड तालुक्यात अवैध्य व्यवसायिकांचा मोठा सुळसुळाट झालेला आहे. त्यातच तालुक्यात वाळू तस्करांनीही मोठा धुमाकुळ घातलेला आहे.  मागील आठ दिवसांपासून जामखेड पोलिसांनी  अवैध्य व्यवसायिकांविरोधात धडक कारवाईचा मोर्चा वळवल्यानंतर शनिवारी रात्रीपासुनच अरणगाव शिवारात जामखेड पोलिसांनी वाळू तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी फिल्डींग लावली होती. अखेर रविवारी पहाटे जामखेड पोलिसांच्या जाळ्यात तीन वाळू तस्कर सापडले.

जामखेड पोलिसांनी  अरणगाव शिवारात ही धडक कारवाई राबवली आहे. यासंदर्भात रविवारी जामखेड पोलिस स्टेशनला तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पहिली फिर्याद पोलिस काँस्टेबल संदिप आजबे यांनी दिली आहे. अरणगाव – रस्त्यावरील इस्सार पेट्रोल पंपाजवळ  MH 16 Q 1011 या हायवा गाडीतून चोरटी वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गाडी सह चार ब्रास वाळू असा दहा लाख वीस हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत  अरविंद रघुनाथ पवार रा शितपुर ता कर्जत  या वाळू तस्कराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद पोलिस काँस्टेबल घनशाम जाधव यांनी दिली आहे. अरणगाव – जामखेड रस्त्यावरील पाटोदा गावाजवळ MH 16 CC 5769  या हायवा गाडीतून वाळूची चोरटी वाहतुक केली जात असल्याचे पथकाला आढळून आले. या कारवाईत गाडीसह सहा ब्रास वाळू असा 25 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करत परमेश्वर पांडूरंग पठाडे रा आष्टी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तिसरी फिर्याद पोलिस काँस्टेबल संदिप राऊत यांनी दिली आहे. यात म्हटले आहे की,  अरणगाव – जामखेड रस्त्यावरील राजेंद्र नर्सरी परिसरात MH 14 AH 6769 या ट्रकमधून वाळूची चोरटी वाहतुक केली जात असल्याचे पथकाला आढळून आले. यावेळी केलेल्या कारवाईत गाडीसह चार ब्रास वाळू असा दहा लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करत रामहरी रमेश डोके रा भूतवडा ता जामखेड  याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू तस्करांविरोधात रविवारी कलम 379 व गौणखनिज कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तीनही कारवाईत एकुण 45 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी बजावली आहे. वाळू तस्करांविरोधातील आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईच्या विशेष पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर, हेड काँस्टेबल शिवाजी भोस, संजय लाटे, पोलिस काँस्टेबल संदीप आजबे, अविनाश ढेरे, संग्राम जाधव, विजयकुमार कोळी, अरूण पवार, बाळासाहेब आवारे, दत्तु बेलेकर, संदिप राऊत यांनी केली आहे