जामखेड : विद्यार्थ्यांनो निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये योगासनांचा अवलंब करा – डॉ. गोरक्ष ससाणे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : निरोगी आरोग्य व मानसिक शांतीसाठी एका दिवसापुरते योगासने न करता त्याचा रोजच्या दिनक्रमात नियमित अवलंब करावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी ‘योग कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थी दशेत शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचे महत्व लक्षात घेता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ससाणे बोलत होते.
यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ.राहुल विधाते, प्रा.अर्चना महाजन उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापिका अर्चना महाजन यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्व पटवून दिले व प्रात्यक्षिकाद्वारे प्राणायमाचे विविध प्रकार व योगासने विद्यार्थ्यांकडून करून घेतली. सदर कार्यशाळेसाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.