जामखेड : संत वामनभाऊ दिंडीचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात, हजारो भाविकांची रिंगण सोहळ्याला उपस्थिती, विठुनामाचा जयघोष करत दिंडी पंढरीकडे मार्गस्थ !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Sant Vamanbhau Maharaj Palkhi Sohala 2023 : श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथून पंढरीच्या दिशेने हजारो वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या संत वामनभाऊ महाराज पालखी (दिंडी) सोहळ्याचे पहिले रिंगण जामखेड तालुक्यातील जमदारवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. (Gahininath Gad)
संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्याचा पहिला रिंगण सोहळा जमदारवाडी येथील संत वामनभाऊ महाराज गड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. भक्तिमय वातावरणात हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने अन् जामखेडकरांच्या उपस्थितीने पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यामुळे जामखेडकर विठूरायाच्या भक्तीत लीन झाले होते. हा सोहळा मंगळवारी पार पडला.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत हभप विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17 जून 2023 रोजी श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. हा पालखी सोहळा याही वर्षी महंत विठ्ठल महाराज यांच्या अधिपत्याखाली मोठ्या थाटात अन् मोठ्या लवाजम्यासह प्रस्थान झाला आहे. या दिंडी सोहळ्याचे योग्य नियोजन आणि प्रयोजन करण्यात आले होते.
गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी, मातकुळी असा प्रवास करत मंगळवारी जांबवाडी येथे दिंडी दाखल झाली. जामखेड शहरात आगमन होताच भक्तांनी दिंडीचे स्वागत केले. ठिकठिकाणी वारकऱ्यांना विविध सामाजिक संघटनांनी फळे, चहा, बिस्कीट,औषध, पाणी याची व्यवस्था केली होती.जामखेड शहरातील श्रीविठ्ठल मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर येथे दुपारी दिंडीचे आगमन झाले. तेथे मानाचा अभंग झाला व रिंगण सोहळा सुरू झाला. मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला होता. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विट्ठल …हा जय जयकार करत भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. त्या पाठोपाठ दिंडीतील दोन अश्व धावू लागले. या अश्वांनी परिसरातून आलेल्या भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडली. यावेळी भाविकांनी एकाच जय जयकार केला.
वारकरी परंपरेचे खेळिया प्रकरणातील अभंग झाले. या अभंगाच्या चालीवर अनेक महिला व पुरुष भक्तांनी फुगडीचा आनंद घेतला. यावेळी , दादासाहेब महाराज सातपुते, बाळकृष्ण महाराज राऊत ऋषिकेश महाराज माने व संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. जमादारवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भागातून पंढरपूरला जाणारी संत वामनभाऊ महाराज यांची ही सर्वात मोठी दिंडी आहे. व या एकमेव दिंडीचे जमदारवाडी येथे रिंगण होते. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. या दिंडीला अनन्य साधारण महत्व आहे. राज्यभरातून सुमारे २५ हजाराहून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.