दर्शना पवार हत्या प्रकरण : एका युक्तीमुळे राहूल हंडोरे अडकला पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Darshana Pawar murder case : रेंज फाॅरेस्ट ऑफिसरपदी (RFO) निवड झालेल्या कोपरगावच्या दर्शना पवार (Darshana Pawar) या तरुणीचा मारेकरी तिचा मित्र राहूल हंडोरे (Rahul Handore) हाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याला पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली.त्याने खूनाची कबुली दिली आहे. दर्शना पवार हिने लग्नास नकार दिल्याने राहूलने तिची राजगड किल्ला परिसरात निर्घृणपणे हत्या केली. त्याला अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले. पोलिसांनी लढवलेल्या एका युक्तीमुळे राहूल हंडोरे हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. राहूल हंडोरे हाच दर्शना पवार हिचा मारेकरी असल्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल (Superintendent of Police Ankit Goyal) यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. (Rahul Handore Latest news)

Darshana Pawar murder case, because of trick, Rahul Handore got caught in pune gramin police net, latest marathi news,

दर्शना पवार ही 26 वर्षीय तरूणी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या तालुक्यातील रहिवासी होती. ड्रायव्हर असलेल्या वडीलांच्या या लेकीनं MPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवलं होतं. ती राज्यात तिसरी आली होती. रेंज फाॅरेस्ट ऑफिसर म्हणून तिची निवड झाली होती. या निवडीनंतर तिचा पुण्यात सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी ती पुण्याला गेली होती. हाच सत्कार सोहळा तिचं आयुष्य उध्वस्त करणारा ठरला.तिच्या जवळच्या मित्राने तिची हत्या केली.या घटनेनं पवार कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दर्शना हिच्या हत्येमुळे कुटुंबाने पाहिलेली मोठी स्वप्न एका क्षणात बेचिराख झाली. (Darshana Pawar latest news)

नेमकी घटना काय ?

रेंज फाॅरेस्ट ऑफिसर बनलेल्या दर्शना पवार या तरुणीचा राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तिची ओळख पटवली होती.शवविच्छेदन अहवालात तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते.दर्शनासोबत राजगड किल्ल्यावर गेलेला तिचा मित्र राहूल हंडोरे हा घटनेच्या दिवसापासून गायब होता. त्याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथक कार्यरत होते. अखेर आज तो पोलिसांना सापडला आणि दर्शना पवार खुन प्रकरणाचे गुढ उकलले गेले.

राहूल हंडोरेच्या शोधासाठी पोलिसांनी लढवली भन्नाट शक्कल

दर्शना पवार हिची हत्या करून गायब झालेल्या राहूल हंडोरेवर पोलिसांनी तपास केंद्रीय केला होता. त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथके कार्यरत होती. तपासाबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती. राहूल हंडोर विविध राज्यात फिरला.चार दिवसांत त्याने मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा असा प्रवास केला. याकाळात पोलिसांनी राहूलच्या शोधासाठी त्याच्या नातेवाईकांची मदत घेतली. त्याचे लोकेशन नुसार पोलिस पथके त्याचा शोध घेत होते. परंतू तो गुंगारा देत होता.

राहूल हंडोरेच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी एक शक्कल लढवली होती. पोलिस राहूल याच्या नातेवाईकाच्या मोबाईलवरून त्याला पैसे पाठवत होते. त्यामुळे राहूल हंडोरेचे लोकेशन ट्रेस होऊ शकले. याच मोबाईल लोकेशनमुळे राहूल हंडोरे वेगवेगळ्या राज्यात फिरत असल्याचे पोलिसांना समजत होते.लोकेशन नुसार पोलिस पथके त्याच्या मागावर होते. तो मुंबईत आला होता. मुंबईहून पुण्याला जात असतानाच पोलिसांनी त्याला अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात बेड्या ठोकल्या, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषद घेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल दत्तात्रय हंडोरे (वय 28 वर्षे, रा. हिंगणे होम कॉलनी, दत्तमंदीराजवळ, कर्वेनगर, पुणे, मुळ रा. मु.पो.शहा, ता. सिन्नर, जि. नाशिक) हा गुन्हयातील मुख्य संशयित असल्याचे व तो गुन्हा घडल्यापासून पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून तपास पथकांनी संशयित राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन अंधेरी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले.

राहुल हंडोरेने दर्शना पवारची हत्या का केली?

दर्शना पवार व राहूल हंडोरे हे दोघे लहानपणापासून ऐकमेकांना ओळखत होते. ते ऐकमेकांचे नातेवाईक होते. दर्शनाच्या मामाचे घर आणि राहुलचे घर समोरा समोर होते. दोघेही पुण्यात MPSC च्या अभ्यासासाठी पुण्यात होते. याच काळात त्याची घनिष्ठ मैत्री झाली. दोघे दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र राहूलने काही दिवसांपूर्वी ब्रेकअप केला होता. परंतू mpsc च्या निकालात दर्शना यशस्वी झाल्यानंतर तो पुन्हा तिच्या मागे लागला होता.दर्शनाशी विवाह करण्याची राहूलची इच्छा होती. रंतू दर्शना mpsc उत्तीर्ण झाल्यानंतर तिचा विवाह दुसर्‍या मुलाबरोबर तिच्या घरच्यांनी ठरवला होता.परंतू  मला थोडा वेळ द्या, मी परिक्षा पास होतो, तोवर दर्शनाचा विवाह करू नका, अशी विनंती राहूलने दर्शनाच्या कुटूंबियांकडे केली होती. परंतू तिचे घरचे आपल्या निर्णयावर ठाम होते.

दरम्यान, दर्शना पवार ही एका कार्यक्रमासाठी पुण्यात आल्यानंतर राहूल हंडोरे याने तिला गाठले. तिला राजगड फिरण्यास जाऊ अशी बतावणी केली. त्यानुसार दोघे 12 जून रोजी सकाळी राजगड किल्ल्यावर गेले. त्यानंतर राहुल हंडोरे याने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून दर्शना पवारची हत्या केली. दर्शना पवारचा कुजलेला मृतदेह आढळून आल्यानंतर राजगड किल्ल्या परिसरातील एका हाॅटेलच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दर्शना पवार व राहूल हंडोरे हे दोघे सकाळी गड चढताना दिसत होते. तर त्यानंतर सकाळी 10 वाजता राहूल हंडोरे हा गडावरून खाली येत असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत होते. त्यावरून दर्शना पवार हिचा खून तिचा मित्र राहूल हंडोरे यानेच केल्याचा संशय बळावला होता. आता हा संशय खरा ठरला आहे. राहूल हंडोरे याने अटक होताच दर्शना पवार हिच्या हत्येची कबुली दिली आहे.