हिम्मत असेल तर माझ्या विरोधात उभं राहून दाखवं – शहाजी पाटलांनी प्रशांत शिंदेंना ललकारले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । तुम्ही इंजिनिअर आहात, तुमची बौध्दिक पात्रता विकास कामात वापरायला पाहिजे होती, चांगली संस्कृती घडविण्यात वापरायला हवी होती,गावाचा विकास करावा यासाठीच तर आम्ही त्यांना संधी दिली होती, पण त्या उपकाराची जाणीव तर त्यांना नाहीच, पण ते म्हणतात की, आमच्या हिमतीवर निवडून आलोय, अरे मग हिम्मत हाय तर उद्याच्याला आमच्यासमोर एकटा उभा राहून दाखवं, तुला हिम्मत दाखवतो, काय असते ती, मी चॅलेंज स्वीकारतो असे सांगत शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार शहाजी पाटील यांनी सरपंच प्रशांत शिंदेंना ललकारत जोरदार हल्लाबोल केला.

जवळा सोसायटीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दोन्ही गटांकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. गोयकरवाडी येथे 14 रोजी सायंकाळी शेतकरी विकास आघाडीची प्रचारसभा झाली. या सभेत बोलताना शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार शहाजी पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी मथुरदास गोयकर हे होते.

यावेळी पुढे बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, विरोधकांनी निवडणूक लादल्यामुळे संस्थेचं चार ते पाच लाखांचं नुकसान झालं आहे, संस्थेचं आणि सभासदांचं हित विरोधकांकडून पाहिलं गेलं नाही. स्वता:चं महत्व वाढवण्यासाठी आणि स्वता:ला नेता व्हायचं या उद्देशाने विरोधकांकडून सोसायटीची निवडणूक लादली गेली आहे, त्यांना सरपंच करण्यासाठी आम्ही सर्वांनी मदत केली होती, संतराम सुळ सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आम्ही न्याय देऊ शकलो नाहीत, परंतू ह्याला संधी दिली, त्या संधीचं ते सोनं करील असं वाटलं,पण ते निघालं पितळ, गावाचा विकास राहिला बाजूला पण गाव भकास करून ठेवलयं असा आरोप पाटील यांनी केला.

पाटील पुढे म्हणाले की, सोसायटी ही शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे, जेव्हा हे सत्तेत येतील तेव्हा आपल्याला फुकट कर्ज मिळणार नाही, टक्केवारी घेत्येल,धाब्यावर चला म्हणत्येल, तिथं आपण ठरवू, तिथं आपण जेऊ, अश्या पध्दतीने जर आपल्याला वाटप करून घ्यायचं असेल तर त्यांच्याबरोबर जावं सभासदांनी, विरोधकांना भरपुर संधी दिली पण ते आज गावाला चॅलेंज करायला निघालेत, त्यांना वाटतं माझ्यासारखा कोणी नाहीच,पण हे गावयं, गाव करील ते राव करू शकत नाही हे ते विसरलेत, त्यांनी आपली वागायची पध्दत बंद करावी, गावाला वेठीस धरू नये, सर्व सामान्य शेतकऱ्याला वेठीस धरू नये.

त्यांना स्वता: वाटतयं की, मी लै हुशार आहे, हुशार आहात ना तुम्ही ? कश्यात? फोडाफोडी करण्यात, तरूण पिढी बिघडवण्यात, कुणाला वाईट मार्गाला लावण्यात यातच तुम्ही हुशार आहात असे टीकास्त्र सोडत हिम्मत असेल तर माझ्या एकट्या विरोधात उभं राहून दाखवं,हिम्मत दाखवायची तर व्यक्तिगत निवडणुकीत उभा राहून दाखवावी, सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरून तू जर हिम्मत दाखवायला निघाला तर मग जनता निवडून कशी देईल असे सांगत माजी चेअरमन शहाजी पाटील यांनी सरपंच प्रशांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी पुढे बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, आज ही निवडणूक आपल्या गावावर लादली गेलेली निवडणूक आहे. गावाने ठरवलं होतं की सोसायटी निवडणुक बिनविरोध करायची, प्रत्येक समाजाने आपल्या पॅनलला एक उमेदवार द्यायचा असा प्रयत्न केला परंतू गावातील काही अपप्रवृत्तींकडून यात खोडा घातला गेला असा आरोप त्यांनी केला.

याचं स्वप्न जरी बघायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो

यावेळी बोलताना गोयकरवाडीचे युवा नेते रंगनाथ ठोंबर म्हणाले की, गोयकरवाडीत पाच पैश्याच काम झालेलं नाही, अश्या लोकांना सोसायटीमध्ये लावल्यानंतर काय होणारय? याचं स्वप्न जरी बघायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो,गेल्या तीन वर्षांत गोयकरवाडीकडे दुर्लक्ष केलं मग तुम्हाला सोसायटीत बसवून काय करायचं? असा थेट सवाल ठोंबरे यांनी केला.

…म्हणून विरोधकांचे धाबे दणाणले

यावेळी बोलताना डाॅ दिपक वाळुंजकर म्हणाले की, शेतकरी विकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे, मतदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने विरोधक उलट सुलट आरोप करत आहेत, वाडीकरांनी शांत संयमी उमेदवार दिला, गोयकरवाडीकर पॅनलला लीड देतील हा विश्वास आहे. नव्या जुन्यांचा मेळ घालून शेतकरी विकास आघाडीने पॅनल तयार केला, ग्रामपंचायतच्या माध्यमांतून ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलयं आता तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे अवाहन वाळुंजकर यांनी गोयकरवाडीकरांना केले.

न्याय द्यायला चुकलात तर पाच वर्षाची सक्तमजुरी

यावेळी बोलताना प्रशांत पाटील म्हणाले की,गोयकरवाडी ही जवळा गावाचं अविभाज्य अंग आहे. गोयकरवाडीवर कधीच अन्याय केला जात नाही. गोयकरवाडी जवळ्यासाठी धाकट्या भावासारखी आहे. गोयकरवाडीत एक बल्ब लावायचं काम विरोधकांनी सरपंच म्हणून केलं नाही.चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता देऊ नका, एक वेळस न्याय द्यायला चुकलात तर पाच वर्षाची सक्तमजुरी झाल्याशिवाय राहणार नाही, मीच सगळ्यात मोठा आहे हे दाखवायचा प्रयत्न केल्यास लोकं विरोधात जातात हे या निवडणुकीतून जनता विरोधकांना दाखवून देईल असे पाटील म्हणाले.

सरपंचाला धडा शिकवा

बाबा महारनवर म्हणाले की, गोयकरवाडीमधलं हे माझं दुसरं भाषण, गेल्या ग्रामपंचायतला वाडीत भाषण केलतं, ज्यांच्यासाठी भाषण केलं आता त्यांच्या विरोधात भाषण करायची वेळ आता आली, पहिल्यांदा त्यांना निवडून द्या म्हणून सांगायला आलतोत, आज त्यांना पाडा म्हणून सांगायला आलोत आम्ही, कारण आमची मोठी अपेक्षा होती की, जवळा गावाचं मोठं नाव करतेल पण सगळचं मातीत घालायचं काम त्यांनी चालवलं आहे अशी घणाघाती टीका करत ग्रामपंचायतीला हुकला मात्र आता हुकू नका सगळे एकत्र येऊन सोसायटीत सरपंचाला धडा शिकवा.जुन्या नेत्यांनी सोसायटी टिकवून ठेवली. विरोधकांनी कौरव आणि पांडवांची भाषा करूच नये, कारण रोज उठून धाब्यावर जाणाऱ्यांनी अशी भाषा करू नये अशी खोचक टीका महारनवर यांनी केली.

विरोधकांचं नेतृत्व हे पोरगळ बारगळ

अशोक पठाडे म्हणाले की, संस्था टिकवण्यासाठी सर्व जेष्ठ नेते एकत्र आले आहेत, विरोधकांचं नेतृत्व हे पोरगळ बारगळ नेतृत्व आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमांतून तुम्ही जे दिवे लावत आहात ते जनता पाहत आहे अशी टीका करत विरोधकांचा सत्ता न देण्याचे अवाहन केले.

प्रदिप दळवींचा शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा

प्रदिप दळवी म्हणाले की, पॅनल एकत्र करण्यात बर्‍यापैकी माझी भूमिका होती, सगळ्यांनाच माहिती आहे, थोडं काही तरी नाराजी असतीच, त्यातली नाराजी झाली होती माझी, म्हणून माझा अपक्ष उमेदवारी अर्ज राहिला, असं काही समजू नका की मी तो ठेवला, मी आता शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

गोयकरवाडीतील माझे विद्यार्थी गुरूदक्षिणा देतील

दशरथ हजारे म्हणाले की, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. पण ते कधी गुरगुरायचं हे समोरच्याला समजत नाही, शेतकऱ्यांवर अन्याय करायचा आणि गुरगुरायचं अशी यांची पध्दत आहे अशी विरोधकांवर टीका करत येत्या 17 तारखेला मला गोयकरवाडीतील माझे विद्यार्थी गुरूदक्षिणा देतील असा विश्वास दशरथ हजारे यांनी व्यक्त केला.

आमच्याबरोबर या आणि अंगावर गुलाल घ्या

डाॅ महादेव पवार म्हणाले की, शितावरून भाताची परिक्षा पाहिली जाते, शेतकरी विकास आघाडीला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, विजयात सामील व्हा अशी प्रदीप दळवी यांची भूमिका असल्यानेच त्यांनी आपल्या पॅनलला पाठिंबा दिला. आपला पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून यायला हवा यासाठी सर्वजण मेहनत घेत आहेत. विरोधक म्हणतात कर्जवाटप करत नाहीत, सभासद वाढवत नाही पण त्यांचा हा आरोप चुकीचा आहे.आमच्याबरोबर या आणि अंगावर गुलाल घ्या असे अवाहन त्यांनी यावेळी केले.

जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे म्हणाले की, आम्ही दिलेला मान पान त्यांना सहन होत नाही, आमची त्यांना काय एलर्जी आहे काय माहिती ? आपण त्यांना संधी, पण आज ते काय सांगातयेत, ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना तुम्ही कौरव म्हणता ? तुम्हाला पदे पाटील समाजानेच दिली ना ? तेही विसरलात का असा सवाल करत स्वता:चा गट निर्माण करण्यासाठी तुम्ही गावाला वेठीस धरले जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.क्राॅस वोटींग करू नका, नात्यागोत्याचा विचार करू नका, मत बाद होऊ नये याची काळजी घ्या, आम्ही नावासाठी नव्हे तर गावासाठी सर्वजण एकत्र आलो आहोत असे हजारे म्हणाले.