प्रशांत शिंदे म्हणतात, ग्रामपंचायत पोटनिवडणुक झाली आणि गावातील पुढाऱ्यांनी मला टार्गेट केले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : विरोधकांचा चेअरमनपदाचा उमेदवार पाहिला तर असं वाटतं की, खाजगी पतसंस्थेचे कायमस्वरूपी चेअरमन असतात तसं या माणसाचं, त्यांच्या सेनापतीचं झालं आहे. अव्हाड सरांनी सांगितलं, तो सारखाचं सांगतोय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अरे गावातली माणसं मेलीत का मग आ ? तो एकटाचयं का ? पाटलातली दुसरी लोक हायेत का नाहीत ? असा सवाल करत आमचा राहूल पाटील चांगलाय ना, युवा नेताय, नेतृत्व करायची धमकयं, तो लोकांसाठी धडपडतोय असे सांगत नव्या चेहर्‍याला संधी देण्याचे अवाहन शेतकरी ग्रामविकास आघाडीचे नेते प्रशांत शिंदे यांनी केले.

जवळा सोसायटी निवडणूकीत शेतकरी ग्रामविकास पॅनल विरूध्द शेतकरी विकास आघाडी असा थेट सामना होत आहे. शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलताना सरपंच प्रशांत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला.

यावेळी बोलताना प्रशांत शिंदे म्हणाले की, जवळा ग्रामपंचायत पोटनिवडणुक झाल्यापासून गावातील पुढाऱ्यांनी मला टार्गेट केले, दोन महिन्यापूर्वी सर्व प्लॅन झाले होते, हे अगोदरच शिजलेलं होतं, मला व उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर तसेच समविचारी लोकांना बाजुला ठेवण्यासाठी सर्व पुढारी  एकत्र झाले आणि त्यानी पॅनल काढला असे प्रशांत शिंदे म्हणाले.

त्यांना स्वता:चे कुटूंब सोडून कुणाला पद द्यायची इच्छा नाही, यांची खाजगी प्रॉपर्टी असल्यासारखं प्रत्येक निवडणुकीत यांना पद हवयं, ग्रामपंचायतीला उभे राहिले की सरपंचपद पाहिजे, सोसायटीला उभे राहिले की चेअरमनपद पाहिजे, तुम्ही सर्वसामान्यांना न्याय देणार की नाही असा विरोधकांना सवाल करत मला काय चेअरमन व्हायचं नव्हतं, माझ्या घरातला कोणी चेअरमनपदाचा उमेदवार नाही किंवा उमेदवारही नाही, मी यांच्याविरोधात का लढतोय ? ही तीच तीच माणसं आहेत जे पाहुण्या रावळ्यात मान सन्मान मिरवण्यासाठी पद घेताहेत यांना बाजुला सारण्यासाठी माझी लढाई आहे असे शिंदे म्हणाले, 

यावेळी बोलताना प्रशांत शिंदे म्हणाले की, माझ्याविरोधात सर्व नेते एकत्र आले, त्यांची प्रचारसभा झाली, त्यात त्यांनी माझ्याविषयीचा द्वेष आपल्या भाषणातून व्यक्त केला. खरं पाहिलं तर विरोधकांमधील अनेक नेते कधी ना कधी सोसायटीचे चेअरमन संचालक झालेले आहेत, त्यांनी खरं तर पुढचं व्हिजन सांगायला पाहिजे होतं, सोसायटीच्या निवडणुकीत निवडून आल्यावर सोसायटीत काय करणार आहेत हा अजेंडा पाहिजे होता, आम्ही पुढच्या काळात काय करणार आहोत हे सांगायला पाहिजे होतं, पण विरोधकांना ते सांगण्यासाठी वेळ नाहीये अशी खोचक टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.

जेव्हा तुमचा ऊस जळत होता तेव्हा तुमच्या मदतीला कोणता पुढारी आला होता ? असा सवाल करत मी हळगाव कारखान्याशी भांडून काही टोळ्या मिळवल्या, मी मोठं काम केलं असं मुळीच म्हणत नाही पण मी छोटीशी धडपड तर  केली गावातले इतर कुठे होते याचा जाब विचारण्याची ही वेळ आली आहे असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

लोकनेते हे संपुर्ण गावाचे असतात, त्यांच्यावर कुणाची मक्तेदारी नाही, लोकनेत्यांच्या विचारांचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही शेतकरी ग्रामविकास पॅनलची स्थापना केली असे स्पष्ट करत डाॅ महादेव पवार यांना बिनविरोध करण्याचा आम्ही प्रयत्न केला, पवार यांच्यासारख्या संयमी माणसाला आम्हाला चेअरमन होताना पहायला नक्की आवडलं असतं, पण त्यांना निवडणुकीत उतरायचं नव्हतं, याचाही उलगडा शिंदे यांनी यावेळी केला.