हळगाव सोसायटीच्या निवडणूकीचा प्रचार तापला, दोन गटांत काट्याची टक्कर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । हळगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीचा प्रचार चांगलाच तापला आहे. येथील निवडणुकीत दोन पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार आहे. सत्तारूढ गटाला हादरे देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. परंतू यासाठी विरोधी गटाला मोठी मेहनत घ्यावी लागत असल्याचे दिसत आहे.

हळगाव सोसायटी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. दोन्ही गटाचे पॅनलप्रमुख व्यक्तीगट गाठीभेटी घेत प्रचार करताना दिसत आहेत. सत्ताधारी गटाचे पारडे जड आहे. परंतू विरोधी गटाने प्रचाराचा धुराळा उडवत मोठी रंगत आणली आहे.

सत्ताधारी गटाकडून गेल्या 25 वर्षांपासून केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला जात आहे. सत्ताधारी गटाकडे एकगठ्ठा वोटबँक आहे. या वोटबँकला आपलेसे करण्यात विरोधी गटाला यश मिळेल का ? यावर तर्क वितर्क लावले जात आहेत.

हळगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेत जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांचे एकहाती वर्चस्व आहे. गेल्या 25 वर्षाहून अधिक काळापासून सोसायटी त्यांच्या ताब्यात आहे. तसेच ग्रामपंचायतवरही त्यांचीच सत्ता आहे.जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांच्या एकहाती वर्चस्वाला धक्का देण्याचे मनसुबे विरोधी गटाने आखले आहेत. विरोधकांना यात कितपत यश येणार हे अगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.

हळगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणूक 13 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात आहे. दुरंगी लढत होत आहे. हळगाव सोसायटीचे एकुण 1265 सभासद आहेत त्यातील 966 सभासद मतदानास पात्र आहेत. 966 पात्र मतदारांपैकी 630 कर्जदार आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून सोसायटी नफ्यात असून 100 टक्के वसूल असल्याने याचे भांडवल सत्ताधारी गटाकडून केले जात आहे. विरोधकांकडून अनेक मुद्दे उपस्थित करून प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे. 5 मार्च रोजी येथील निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याच दिवशी रात्री निकाल जाहीर होणार आहे.

या निवडणुकीच्या मतदानाला अवघे तीन दिवस उरले आहेत. दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू आहे. सभासदांच्या गाठी भेटी बैठका सुरू आहेत. हळगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.