जवळा खून प्रकरणाचा उलगडा, 2 जण अटकेत, जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सोने देण्याच्या बहाण्याने एका परप्रांतीयांचा खून करून 3 लाख रूपये घेऊन फरार झालेल्या दोघा आरोपींना बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड गुन्हा शोध पथकाने पार पाडली आहे. अटकेतील आरोपी गेल्या चार वर्षांपासून फरार होते.

याबाबत सविस्तर असे की, खोटे सोने खरे आहे असे भासवुन मनोरंजन जोगेश हालदार व त्याचा भाऊ श्रीकृष्ण हालदार ( दोघे रा पश्चिम बंगाल) यांना जवळा गावात बोलावुन आरोपी केळ्या टका-या काळे, संगिता केळ्या काळे, महावीर केळ्या काळे या तिघा आरोपींनी त्यांच्याकडील खोटे सोने दाखवुन फिर्यादीकडुन 3 लाख रूपये घेवुन फसवणुक केली होती.

पंरतु सदरचे सोने हे खोटे असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्याने फिर्यादी व त्याचा भाऊ यांनी आरोपींना दिलेले पैसे परत हिसकावुन घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी व फिर्यादीचा भाऊ श्रीकृष्ण हालदार यांच्या झटापट झाली होती.या झटापटीत आरोपी यांनी फिर्यादीस लाथाबुक्याने मारहाण करून फिर्यादीचा भाऊ श्रीकृष्ण हालदार याच्यावर धारदार चाकुने वार करून गंभीर जखमी केले होते. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

उपचारा दरम्यान फिर्यादीचा जखमी भाऊ श्रीकृष्ण हालदार हा मयत झाला होता. त्यानुसार जामखेड पोलिस स्टेशनला गु.र.नं.52/2018 भादवि कलम 302,394 ,397,420 प्रमाणे केळ्या टका-या काळे ,संगिता केळ्या काळे ,महावीर केळ्या काळे सर्व रा.जवळा ता.जामखेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मनोरंजन जोगेश हालदार रा.नेवलिया पो.पुर्व विष्णुपुरा ता.चारधाव जि.नदीया राज्य पच्छिम बंगाल हल्ली रा.भंडारवाडी ता.जि.उस्मानाबाद यांनी फिर्याद दाखल केली होती.

मागील 4 वर्षापासुन आरोपी केळ्या टका-या काळे ,संगिता केळ्या काळे, महावीर केळ्या काळे हे तिघे फरार होते. वेषांतर करून ते राहत होते. पोलिसांना सतत गुंगारा देत होते. या खून प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड करण्यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड गुन्हा शोध पथक गेल्या काही महिन्यांपासून या आरोपींच्या मागावर होते.

अखेर 28 फेब्रुवारी रोजी केळ्या टका-या काळे ,संगिता केळ्या काळे हे दोन्ही फरार आरोपी सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस भागात आपले अस्तित्व लपवून ऊसतोडणीचे काम करत असल्याची बातमी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हा शोध पथकाने पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातील वेळापुर भागात सापळा लावून दोघा आरोपींना जेरबंद केले. अटकेतील आरोपींना जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी शअण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पो.उप.नि.राजु थोरात ,पोना.अविनाश ढेरे, पोना.संग्राम जाधव, पोकॉ.संदिप राऊत ,पोकॉ.विजय कोळी ,पोकॉ.आबा आवारे ,पोकॉ.अरूण पवार , पोकॉ.संदिप आजबे, मपोकॉ. कोमल भुंबे यांनी केली आहे .सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.संजय लाटे व पोकॉ.सचिन पिरगळ हे करीत आहेत.

या प्रकरणातील फरार तिसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी जामखेड पोलिसांनी कंबर कसली आहे. जवळा खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाला यश आल्याने जामखेड पोलिसांचे कौतुक होत आहे.