Zilla Parishad by-election Mahavikas Aghadi won highest number of seats | जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने चारली भाजपला धुळ, जिंकल्या सर्वाधिक जागा

46 जागांवर महाविकास आघाडीचा विजय

Zilla Parishad by-election Mahavikas Aghadi won highest number of seats |  जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीने भाजपला धुळ चारत सर्वाधिक 46 जागांवर विजय पटकावला. भाजपला अवघ्या 23 जागांवर विजय मिळवता आला. तर इतरांनी 16 ठिकाणी विजय संपादन केला. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीतही हेच चित्रं राहिल्यास भाजपला कायमच सत्तेपासून दूर राहावं लागणार असल्याचं चित्रं आहे.

राज्यातील अकोला, धुळे, नंदुरबार, पालघर,  नागपूर व वाशिम या सहा जिल्हा परिषदांची पोटनिवडणुक अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडली होती. 85 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र निवडणुकीला सामोरे गेले होते. बुधवारी या निवडणुकीचे निकाल हाती आले.  23 जागांवर जिंकून भाजप स्वतंत्रपणे सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जिंकलेल्या जागा भाजप पेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीने सर्वाधिक 46 ठिकाणी विजय मिळवून भाजपला धोबीपछाड दिला आहे.

अकोल्यात 14 जागांपैकी भाजप, काँग्रेस, शिवसेनेने प्रत्येकी एक, राष्ट्रवादीने दोन आणि इतरांनी 9 जागा जिंकल्या आहेत.

धुळ्यात 15 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 8, काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी दोन आणि राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवला आहे.

नंदूरबारमध्ये 11 जागांपैकी भाजपने 4, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी 3 आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली आहे.

नागपूरमध्ये मात्र भाजपला काहीसा धक्का बसला आहे. नागपूरच्या 16 जागांपैकी भाजपने 3, राष्ट्रवादीने 2, काँग्रेसने 9 आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे. नागपूरमध्ये शिवसेनेला खातंही खोलता आलं नाही.

पालघरमध्ये 15 जागांपैकी शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी पाच, राष्ट्रवादीला चार आणि इतरांना एका जागेवर विजय मिळाला आहे. पालघरमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. तर वाशिममध्ये 14 जागांपैकी भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, राष्ट्रवादीला 5, इतरांना 4 आणि शिवसेनेला एका जागेवर विजय मिळविता आला आहे.

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. अपवादात्मक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. तर मनसे आणि भाजपचीही युती झाली होती. मात्र, एकंदरीत सर्वच ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपआपलं बळ दाखवलं होतं.

जिल्हा परिषदेच्या 85 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 23 जागांवर भाजपने विजय मिळवला तर काँग्रेसने 17, राष्ट्रवादीने 17, शिवसेनेने 12 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविल आहे. तर आघाडी आणि युतीनिहाय आकडेवारी पाहता महाविकास आघाडीने 46, भाजपने 23 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविला आहे. महाविकास आघाडी एकसंधपणे निवडणुकीला सामोरे गेल्यास अगामी निवडणूकीत या पेक्षा वेगळे चित्र असु शकते असा कयास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे.

जिल्हा परिषद पोटनिवडणुक निकाल खालील प्रमाणे

भाजप- 23
राष्ट्रवादी- 17
शिवसेना-12
काँग्रेस-17
इतर- 16

Zilla Parishad by-election Mahavikas Aghadi won highest number of seats |
photo – tv9 marathi