पुढील चार दिवस धोक्याचे : जामखेडसह अहमदनगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड सह संपुर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील  चार दिवस संपुर्ण अहमदनगर जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार आहे. बुधवारी दुपार पासुन जामखेड तालुक्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटास सुरूवात झाल्याचे वृत्त आहे.

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकणी इतका पाऊस झाला आहे की शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र काही भागात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाल्याने ज्या भागात दमदार पाऊस झाला नाही त्या भागाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वायव्य भारतातून माघारी परतण्याचा पोषक स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण देशाला पाऊस देणारा मान्सून आजपासून परतीच्या प्रवासावर निघण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.अरबी समुद्रात आलेले शाहीन चक्रीवादळ ओमानकडे गेल्यानंतर भारताच्या काही भागातून मोसमी वारे माघारी परतण्यासाठी अनुकूल हवामान झाले आहे. आज दिनांक 06 ऑक्टोबरपासून मान्सून परतीच्या प्रवासावर निघणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

हवामान विभागाकडून राज्यात येलो अलर्ट जारी

हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे याभागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे या भागांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जामखेडमध्ये दुपारपासून पावसास पोषक वातावरण

हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या येलो अलर्ट नुसार बुधवारी 06 रोजी दुपारपासून जामखेड तालुक्यात अकाशात ढगांची गर्दी झाली होती, हवामानात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता.काही भागात रिमझिम पाऊस सुरू झाला होता.तसेच काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसास सुरूवात झाल्याचे वृत्त आहे.

नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचे अवाहन

जामखेड तालुक्यातील बहुतांश प्रकल्प आता भरल्यात जमा आहेत. पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या येलो अलर्ट मुळे  तालुक्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यास नद्यांना, ओढ्यांना पुर येऊ शकतो. या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे अवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.