Lakhimpur violence case | लखीमपुर हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने केली महाराष्ट्र बंदची घोषणा

Lakhimpur violence case | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील लखीमपुर हिंसाचार प्रकरणावर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. (Mahavikas Aghadi announces Maharashtra Bandh in Lakhimpur violence case)

केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने उत्तर प्रदेशातील लखीमपुर शेतकरी अंदोलकांना चिरडण्याचा व्हिडीओ वायरल होताच देशभरातून वेगवेगळ्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनी सरकारला धारेवर धरत गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासह मंत्र्यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना लखीमपुर ला जाऊ दिले जात नसल्याने आणखीनच भडका उडालेला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी, आपचे नेते खासदार संजय सिंह यांनी लखीमपुर जाण्यासाठी लखनौ गाठले खरे पण त्यांना लखीमपुरला पोलिसांनी जाऊ दिले नाही.

प्रियंका गांधी यांना नजरकैदेत ठेवले गेले. त्यानंतर अटक केली गेली. प्रियंका गांधी व पोलिस यांच्या संवादातील व्हिडीओही जोरदार वायरल झाला. प्रियंका आक्रमकपणे पोलिसांना झापत असल्याचे यात दिसत आहे. राहुल गांधी यांनाही पोलिसांनी लखनौ विमानतळावर आडवले होते. अनेक नाट्यमय घडामोडी नंतर उत्तर प्रदेश सरकार विरोधकांपुढे झुकले आहे.

राहुल गांधी, प्रियंका गांधी व इतर विरोधी पक्षातील नेत्यांना उत्तर प्रदेश सरकारने लखीमपुर भागात जाण्यास बुधवारी परवानगी दिली आहे. आता विरोधी पक्षातील नेते लखीमपुरला गेल्यावर काय राजकीय नाट्य घडते याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान दुसरीकडे लखीमपुर हिंसाचाराच्या मुद्द्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी केली आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने येत्या 11 ऑक्टोबर लखीमपुर हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्र बंद ठेवला जाणार आहे. या अंदोलनात भाजप विरोधातील सर्व पक्षांना सामावून घेतले जाणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. त्यासंदर्भात सर्व समविचारी पक्षांशी बोलणी सुरू असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.11 तारखेला होणाऱ्या महाराष्ट्र बंदच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहतील असेही पाटील यांनी स्पष्ट केले. बुधवारी पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,  काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंदची घोषणा केली.

राज्य सरकारने वाहिली श्रध्दांजली

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव केला. मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहिली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निवेदन दिले.

जयंत पाटलांनी साधला मोदींवर निशाणा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दोन कलाकारांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहणारे दोन ट्विट केले आहेत. पण दुसरीकडे लखीमपूर खेरी येथे घडलेल्या दुर्घटनेला तीन दिवस उलटल्यानंतरही शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करणे पंतप्रधानांना जमलेले नाही. शेतकऱ्यांच्या हत्येसारख्या अत्यंत गंभीर विषयावर कोणतीही प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केलेली नाही. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मृत्यूचे कोणतेही सोयर सुतक राहिलेले नसल्याचे हे द्योतक आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी कधी ट्विट करणार? असा प्रश्न जनतेला पडला आहे असे ट्विट करत जयंत पाटील यांनी नरेंद्र मोंदीवर जोरदार निशाणा साधला आहे.