तुम्हाला सत्ता पाहिजे ना? मी येतो तुमच्यासोबत, पण मला तुरुंगात टाका, मी तयार आहे – मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावलं

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । दुसऱ्यांना वाईट म्हणण्याआधी स्वत:कडे पाहिलं पाहिजे. तुम्हाला सत्ता पाहिजे ना? मी येतो तुमच्यासोबत. पण सत्तेसाठी नाही. मर्द असाल तर मला तुरुंगात टाका. कुटुंबाशी काय खेळता? कुटुंबीय आणि शिवसैनिकांना त्रास देण्यापेक्षा मी आज तुम्हाला सांगतो. हिंमत असेल तर माझ्याशी लढा आणि मी तुमच्यासोबत येतो मला तुरुंगात टाका”, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात (Budget session maharashtra 2022) आज निवेदन सादर करत विरोधी पक्षांच्या आक्षेपांना जशास तसे उत्तर दिली. ‘आम्ही सगळे भ्रष्टाचारी आहोत, दाऊदची माणसं आहोत मग सकाळच्या सत्तेचा प्रयत्न सफल झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले नसते का? आम्ही जर तुमचा पट्टा बांधला असता तर आमच्या कुटूंबाची बदनामी केली असती का ? असा सवाल करत आज आमच्या कुटुंबाची बदनामी करता जी नीच आणि निंदनीय आहे अश्या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावलं.

मर्द असाल तर मर्दासारखा अंगावर या, ना मर्दासारखे लढू नका. केंद्रीय यंत्रणा वापरायच्या कुटुंबीयांना बदनाम करायचे? ‘हा महाराष्ट्र आहे.धृतराष्ट्र नाही. मी घाबरलो म्हणून बोलत नाही. यातून काहीच होणार नाही. ही संधी आहे, संधीचं सोनं करण्याचे काम आहे.काही सुचना असतील सांगा, कोण गुन्हेगार असेल तर सांगा आम्ही कारवाई करू.

पण तुम्हाला सत्ता हवी आहे, म्हणून तुम्ही कुटुंबाला तणावात आणायचे, जामीन मिळू द्यायचा नाही, हा कसला मर्दपणा, तुम्हाला सत्ता हवी आहे ना. चला सगळ्यासमोर सांगतो, मी तुमच्यासोबत आहे. उगाच पेनड्राईव्ह गोळा करू नका, पेन ड्राईव्हची गरज नाही. मी तुमच्यासोबत येतो. पण सत्तेसाठी नाही तर मला थेट तुरूंगात टाका. माझ्याशी वाद आहे ना मग मला तुरुंगात टाका. मी तयार आहे’ असंही उद्धव ठाकरेंनी सुनावलं.

“केंद्रीय यंत्रणा आज ज्यापद्धतीनं काम करत आहेत ते पाहता ही ईडी आहे की घरगडी तेच कळत नाही. मलिकांच्या संपत्तीवर टाच, देशमुखांच्या संपत्तीवर टाच. कुटुंबीयांची बदनामी करायची. हे अतिशय नीच आणि निंदनीय राजकारण आहे. टाचेला मी घाबरत नाही…खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर भाष्य केलं.

“केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रकार अत्यंत नीच आणि निंदनीय आहे. ज्या शिवसैनिकांनं ९० च्या दंगलीत आपल्या जीवाची पर्वा न करता हिंदूंच्या बचावासाठी जीवाचं रान केलं. आज त्यांना तुम्ही त्रास देत आहात. मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो. त्यांना कशाला त्रास देता. मी येतो तुमच्यासोबत. सत्तेसाठी जीव जळत असेल तर मी येतो तुम्ही मला तुरुंगात टाका”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“दाऊदचा विषय सध्या खूप चघळला जात आहे. रामाच्या नावानं मतं मागून झाली. आता दाऊदच्या नावानं मत मागणार का? दाऊद नेमका आहे तरी कुठं हे काही तुम्हाला माहित आहे का? अमेरिकेत ओबामानं कधी ओसामाच्या नावानं मतं मागितली होती का?”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

तसंच फडणवीसांनी खरंतर ‘रॉ’मध्ये घेतलं पाहिजे. तिथं जे झटपट प्रकरणं सोडवतील. ज्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांवर तुम्ही आरोप करत आहात. त्यांना आज तुरुंगात टाकलं आहे. तेच मलिक आणि देशमुख तुम्हाला पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग यशस्वी झाला असता तर चालले असते ना?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.