रोहित पवार विधानसभेत आक्रमक, राज्यातील पोलिस बांधवांच्या विविध प्रश्नाकडे वेधले सरकारचे लक्ष !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यातील पोलिस बांधवांच्या प्रश्नावरून आमदार रोहित पवार हे विधानसभेत आक्रमक झाल्याचे दिसून आले. पवार यांनी राज्यातील पोलिस बांधवांच्या अनेक दुर्लक्षित अडचणी व समस्यांविषयी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. (Rohit Pawar is aggressive in the assembly on various pending issues of the maharashtra police)

राज्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी वैयक्तिक कुटुंबाची व घराची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र रस्त्यावर असतात. दिवाळी असो अथवा कोणताही सण, उत्सव ही पोलीस मंडळी कायम जनतेच्या सुरक्षेसाठी तत्परतेने उभी असतात.

पोलीस बांधवांच्या अनेक दुर्लक्षित अडचणी व समस्या आहेत याकडे आमदार रोहित पवार यांनी पोलिसांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेतले आणि सरकारनेही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी अधिवेशनात बोलत असताना आमदार रोहित पवार यांनी पोलिसांसाठी कॅशलेस रुग्णालयांच्या संख्येत वाढ करावी, निवृत्तीनंतरही त्यांना आरोग्यसेवा मिळावी, पोलिसांवर येणारा ताण कमी करण्यासाठी त्यांच्या किरकोळ रजेमध्ये वाढ करावी तसेच पोलिसांना राहण्यासाठी प्रशस्त व चांगली निवासस्थाने सरकारतर्फे उपलब्ध करून द्यावी या सह अन्य मागण्या करत गृह विभागाचे लक्ष वेधले.

लक्षवेधीला उत्तर देत असताना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काळात नक्कीच या संदर्भात सकारात्मक पावले उचलली जातील असे बोलून दाखवले.