या क्षणाची सर्वात मोठी बातमी : पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ED कडून अटक

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Sanjay Raut Arrested by ED : शिवसेना खासदार संजय राऊत यांना दीर्घ चौकशीनंतर Ed कडून रविवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. राऊत यांच्यावरील कारवाईचे रविवारी तीव्र पडसाद उमटले. राजकीय नेत्यांनी या कारवाई विरोधात टीकेची झोड उठवली होती तर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी या कारवाईचे स्वागत केले होते.

गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात आले.

सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १० अधिकाऱ्यांचे पथक राऊत यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संजय राऊतांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची सुमारे ८ तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली.

या प्रकरणी चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीने चार वेळा समन्स बजावले होते. त्यांपैकी केवळ एकदाच ते चौकशीसाठी हजर राहिले. तीन वेळा ते गैरहजेर राहिल्यानंतर आज अखेर ईडीचे पथक थेट संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी ईडीच्या पथकाने झाडाझडती घेतली आणि त्यांची साडे नऊ तास चौकशी केली.

त्यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र तपासात सहाकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत ईडीचे अधिकारी संजय राऊतांना मुंबईतील ईडी कार्यालयात घेऊन गेले.त्यानंतर तेथेही त्यांची सुमारे ८ तास चौकशी करण्यात आली आणि अखेरीस त्यांना अटक केल्याची बातमी मध्यरात्री समोर आली.

संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आमदार सुनील राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, भारतीय जनता पार्टी संजय राऊतांना घाबरली. संजय राऊतांना बोगस केस बनवून अटक करण्यात आली आहे. त्यांची उद्या सकाळी वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल.

संजय राऊतांना चुकीच्या आरोपांखाली अडकवण्यात आले आहे. आम्ही न्यायायलात नक्कीच लढा देऊ. गोरेगांव च्या पत्राचाळ प्रकरणाचे आरोप करून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही नक्कीच या विरोधात आवाज उठवू”, अशी माहिती बंधू सुनील राऊत यांनी दिली.