जामखेडला रंगणार कुस्त्यांचे थरारक मैदान, नागपंचमी यात्रेनिमित्त कै. विष्णू (उस्ताद) काशीद प्रतिष्ठानकडून कुस्ती मैदानाचे आयोजन !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कै.विष्णू (उस्ताद) काशिद प्रतिष्ठानच्या वतीने जामखेड नागपंचमी यात्रेनिमित्त भव्य जंगी निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे येत्या 3 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष तथा कै. विष्णू (उस्ताद) काशिद प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक अजय (दादा ) काशिद यांनी दिली.

जामखेडची नागपंचमी यात्रा महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात. गेल्या 19 वर्षापासून जामखेडच्या नागपंचमी यात्रेला कै. विष्णू उस्ताद काशीद उर्फ बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य अश्या जंगी निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे मोठ्या दिमाखात आयोजन केले जाते.

जामखेड नागपंचमी यात्रेला राज्यात मिळाली नवी ओळख

दरवर्षी होणाऱ्या जंगी निकाली कुस्त्यांसाठी जामखेड तालुक्यासह, राज्यातील तसेच परराज्यातील पैलवान मोठ्या संख्येने हजेरी लावतात. नेत्रदीपक, चित्तथरारक, डाव प्रतिडावांचा थरार दरवर्षी कुस्तीप्रेमींना अनुभवायला मिळतो, देशातील नामवंत मल्ल लावत असलेल्या हजेरीमुळे जामखेड नागपंचमी यात्रेला राज्यात नवी ओळख निर्माण झाली. जामखेड आणि शेजारील तालूक्यातील नागरिक जामखेडच्या कुस्ती मैदानाची दरवर्षी चातकासारखी वाट पाहत असतात.

खालील ठिकाणी होणार कुस्तीचे जंगी मैदान

यंदाही कै.विष्णू (उस्ताद) काशीद प्रतिष्ठानच्या वतीने जामखेड नागपंचमी यात्रेनिमित्त भव्य जंगी निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे येत्या 3 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 7 या वेळेत जामखेड शहरातील मराठी शाळेच्या बाजूच्या मैदानात आयोजन करण्यात आले आहे.

दिग्गज नेत्यांची असणार उपस्थिती

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा  आमदार प्रा राम शिंदे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सुरेश (आण्णा) धस, आ.रोहित (दादा) पवार, आ.बाळासाहेब (काका) आजबे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण (भाऊ) मुंडे, इंदोर मध्य प्रदेश येथील भाजपाचे नेते अशोकजी खंडेलवाल, हिंद केसरी रोहितजी पटेल, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी(DYSP), राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक तथा अर्जुन पुरस्कार विजेते.राहुल आवारे (DYSP) सह आदी दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यंदाच्या कुस्ती मैदानाचे खास आकर्षण

महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांच्यात होणारी लढत जामखेड नागपंचमी यात्रेनिमित्त होणाऱ्या भव्य निकाली कुस्ती मैदानाचे खास आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशभरातील दिग्गज मल्लांच्या निकाली कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत.

कुस्ती मैदानाचे यंदा 20 वे वर्षे

जामखेड नागपंचमी यात्रेनिमित्त होणाऱ्या भव्य निकाली कुस्ती मैदानाचे यंदा 20 वर्षे आहे. कुस्तीला आणि कुस्तीपट्टूंना ताकद देणारे मैदान म्हणून जामखेडच्या मैदानाने राज्यात नावलौकिक मिळवला आहे. यंंदा जामखेडमध्ये भरणारे कुस्त्यांचे मैदान यशस्वी करण्यासाठी उपमहाराष्ट्र केसरी बबन (काका )काशीद आणि मराठा भाषिक महासंघाचे अध्यक्ष मराठा गौरव युवराज (भाऊ) काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली कै.विष्णू (उस्ताद) काशीद प्रतिष्ठान आणि अजयदादा काशिद मित्रमंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र दरवर्षी मेहनत घेत आहेत.

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा होणार सन्मान

अजयदादा काशिद मित्र मंडळाच्या वतीने जामखेड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान तसेच जामखेड तालुक्यातील शालेय खेळाडू आणि विद्यार्थ्यांचा स्पोर्ट्स टी शर्ट देवून सन्मान करण्यात येणार आहे.