संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या नोटांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचे नाव

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या घरातून ११ लाखांची रोकड सापडली आहे. यापैकी १० लाखांची रक्कम असलेल्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने अटक केली. जवळपास १६ तास चौकशी केल्यानंतर राऊतांना अटक करण्यात आली आहे.राऊतांच्या भांडुप येथील घरातून ईडीने ११ लाखांची रोकड जप्त केली आहे. या ११ लाखांपैकी १० लाखांच्या नोटांच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख असल्याची खळबजनक माहिती सुनील राऊत यांनी दिलीये.

या प्रकरणी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले की, असं असण्याची शक्यता आहे की, एकनाथ शिंदेंच्या विरोधात त्यांना जे काही करायचं आहे, त्यासाठी त्यांना अयोध्येला जायचं असेल आणि म्हणून त्यांनी हे पैसे राखीव ठेवले असतील. त्यामुळे प्रत्येक पैशाचा सोर्स दाखवावा लागतो, त्यांनी तो दाखवावा.

शरद पवारांनी प्रतिक्रिया देण्यास टाळलं

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने केलेल्या कारवाई संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळलं आहे. त्यामुळे शरद पवार यांची नेमकी भूमिका काय याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातच ईडीच्या सर्वाधिक कारवाया  – नीलम गोर्‍हे

इतर राज्यांपेक्षा ईडीच्या सर्वाधिक कारवाया महाराष्ट्रातच सुरू आहेत. त्यातही विरोधी पक्षाचे नेतेच रडारवर आहेत. जनतेला यामागचा नेमका अर्थ उमगला असून, ईडीचा गैरवापर होत असल्याची टीका विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोर्‍हे यांनी केली.