जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कुकडीच्या पाण्यावरून भाजपाचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सचिन पोटरे सध्या आक्रमक झाले आहेत. पोटरे यांनी आमदार रोहित पवार यांना फेसबुक पोस्टद्वारे एक अनावृत्त पत्र लिहीत जोरदार हल्लाबोल केला आहे. या पत्रात पोटरे यांनी पवारांवर गंभीर आरोप करत कुकडीच्या पाण्याचा मुद्दा तापवला आहे. सचिन पोटरे यांनी आमदार रोहित पवार यांना लिहलेले पत्र खाली जसेच्या तसे ! (Sachin Potre’s attack on MLA Rohit Pawar from Kukdi water)
प्रिय आ.रोहित दादा पवार साहेब
सप्रेम नमस्कार,
कर्जत जामखेड च्या जनतेने तुम्हाला दिलेल्या भरभरून प्रेमामुळे व आपण देशाचे नेते मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांचे नातू असल्याने या मतदारसंघात आता जादू होऊन काहीतरी जगापेक्षा वेगळं दिसेल अशी भोळी भाबडी आशा आमच्या जनतेच्या झाल्या होत्या त्यात त्यांची काडीचीही चूक नाही कारण त्यावेळी इव्हेंट मॅनेजमेंट व इतर अनेक व्यवस्थेने तसे वातावरण केले गेले होते …. असो या कोरोनाच्या काळात ही यावेळी मागच्या पेक्षा आपली सक्रियता चांगली आहे…..राजकारणात आशा गोष्टी होतच राहतात परंतु आपणाला महाराष्ट्रात व राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात प्रोजेक्ट करत असताना तुम्ही आमच्या कर्जत तालुक्याच्या च्या मूलभूत प्रश्नांकडे खूपच दुर्लक्ष केलं आहे त्यामुळेच शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर आम्हाला रस्त्यांवर उतरून आवाज उठवायला लागला व अनेक प्रश्न निकाली ही लागले… दादा ..आपण निवडून आल्या पासून कुकडीच्या पाण्याच्या आवर्तनात कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांवर खूप अन्याय होतोय . कुकडीच्या पाण्याच्या राजकारणात तुम्ही पुणे जिल्ह्याला झुकते माप देत आहात हे स्पष्टपणे आम्हाला दिसतंय…कारण मागच्या महिन्यात विविध वृत्तपत्रात ” कुकडीचे पाणी पुणे जिल्ह्याने पळवले .’ आशा हेडिंगच्या बातम्या श्रीगोंदा ,पारनेर व कर्जत तालुक्यातून लागल्या यावर विरोधक म्हणून आम्हीही तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांना या संदर्भात प्रश्न उपस्थित केले परंतु कोणीच याची दखल घेतली नाही…माजी पालकमंत्री श्री.प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सण 2014 पासून आपण निवडून येईपर्यंत कुकडीचे आवर्तने एकदम नियमितपणे व सुरळीत चालू होते …परंतु तुम्ही कायम राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रतिक्रिया देत आहात त्याच वेळी देशाच्या पंतप्रधान ते महाराष्ट्राच्या राजकारणावर ही आपले नेहमी मत व्यक्त करत असतात त्यानिमित्ताने आपला मतदारसंघ चर्चेत राहतोय मात्र….कुकडीच्या आवर्तनासाठी कर्जत तालुक्यातील शेतकरी व त्याची शेती आसुसलेली आहे हे तुमच्या कसं लक्षात येत नाही ..? कुकडीचे पाणी ही कर्जत तालुक्याची अस्मिता आहे व या अस्मितेच्या राजकारणात तुम्ही मॅनेज झालेले दिसताय….तुम्ही कुकडीच्या पाण्यासाठी पुणे जिल्यातल्या लोकप्रतिनिधी बरोबर का भांडत नाहीत..? आत्ताच्या 9 मे 2021 ला जर पाणी सुटणार असेल तर करमाळ्यात तेच पाणी 16 तारखेपर्यंत पोहचेल तिथे आठ दिवस पाणी सोडणार असतील तर ते पाणी 25 मे पर्यंत करमाळा तालुक्यात राहील आणि मग 25 मे पासून कर्जत तालुक्याला 10 दिवस पाणी म्हणजे 5 जून पर्यंत ते पाणी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार म्हणजे तोपर्यंत पावसाळा चालू झालेला असेल व थोडीफार राहिलेली पिके हातची निघून गेलेली असतील व मग नंबर श्रीगोंदा व पारनेर तालुक्याचा…? पावसाळ्यात पाणी..? म्हणजे ” कुकडीच्या पाण्याचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे ‘ हे तुमच्या कसे लक्षात येत नाही दादा..? मागच्या मार्च च्या दरम्यान मधील आवर्तन ही ज्वारी ची काढणी झाल्यानंतर सुटले होते त्यावेळी ही पाण्याचा काहीच उपयोग झाला नाही…..कोरोनाचा काळ होता म्हणून ठीक नाहीतर कर्जत तालुका आंदोलनाचा जनक आहे…या कर्जत मधेच मराठा क्रांतीची बीजे रोवली गेली आहेत येथेच आमच्या कोपर्डी च्या ताई ला न्याय मिळण्यासाठी मशाल पेटवली गेली होती आणि त्यामुळे आरक्षण विषयावर सुद्धा पुन्हा सुरवात येथूनच होईल दादा….या अग्निकुंडात आम्ही कायम सक्रिय आहोत ….कदाचित आमचं दुर्दैव हे असेल आणि तुमचं नशीब की आम्हाला पवार साहेबांन एव्हढा मोठा आजोबा नाही परंतु या गोष्टीचा फायदा तरी आम्हाला मिळवून दिला पाहिजे…गेली काही वर्षे आम्ही कायम रस्त्यांवर लढतोय…त्यामुळे तुम्ही फार काळ आम्हाला दुर्लक्षू शकणार नाहीत…कोरोनाच्या काळात शेतकरी अजून मेटाकुटीला आला असून भविष्यात तरी कुकडीच्या पाण्याचा खेळखंडोबा होणार नाही याची काळजी घ्या दादा….
कळावे …
आपला विश्वासू…
सचिन पोटरे- जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अहमदनगर ( द )
( मा.आ.रोहित दादांना अनावृत्त पत्र )