हळगावच्या ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेने दिला आरोळे हाॅस्पीटलला आर्थिक मदतीचा हात !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आरोळे कोविड रूग्णालयाला नुकतीच 11 हजार 111 रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. गेल्या वर्षापासून जामखेड येथील डाॅ रविदादा आरोळे व डाॅ शोभाताई आरोळे हे बहिण भावंड जामखेड तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांवर मोफत उपचार करत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांवर मोफत उपचार करणार्या आरोळे हाॅस्पीटलला समाजातील दानशुरांकडून आर्थिक मदत तसेच धान्य, किराणा याचीही मदत केली जात आहे. आरोळे हाॅस्पीटलने हाती घेतलेल्या मानवतेच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी हळगाव येथील ग्रामीण बहुउद्देशीय संस्था आता पुढे आली आहे. संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी नुकतीच आरोळे हाॅस्पीटलला भेट देत संस्थेच्या वतीने 11 हजार 111 रूपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुलताना भाभी यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी सत्तार शेख (पत्रकार ) , आकाश ढवळे, आसिफभाई सह आदी उपस्थित होते.

आरोळे हाॅस्पीटलने हाती घेतलेल्या मानवतेच्या कार्यामुळे आजवर सुमारे सहा हजार पेक्षा अधिक रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. समाजातील दानशुरांनी आरोळे हाॅस्पीटलच्या मानवतेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीबरोबरच धान्य, किराणा व भाजीपाल्याची मदत करावी असे अवाहन संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी केले आहे.