2024 नंतर राष्ट्रवादीचे सुत्रे कोणाच्या हाती असणार ?, राष्ट्रवादीने शिवसेना फोडलीय का ?, शिवसेनेसोबत युती होणार का ?, यावर रोहित पवार स्पष्ट बोलले

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित सरकार राज्यात सत्तेवर आले. या सर्व घडामोडीत शिंदे गटाकडून राष्‍ट्रवादीवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रेंगाळत चालला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर आहेत.तर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात रोज बैठका घेत आहेत. या सर्व घडामोडीत राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी काही गोष्टींवर मोठे भाष्य केले आहे.

राष्ट्रवादीने शिवसेना फोडलीय का ? 2024 नंतर राष्ट्रवादीचे सुत्रे कोणाच्या हाती असणार ? शिवसेनेसोबत अगामी काळात युती होणार का ? या सर्व गोष्टींवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. रोहित पवार यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा मात्र रंगु लागली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्र आपल्याच हाती येणार

जमिनीवर राहण्याची मागच्या पिढीची शिकवण स्विकारुन ती आत्मसात केली आहे. 2024 पर्यंत याच शिकवणीतून आम्ही चालणार आहोत. मात्र, 2024 नंतरचा काळ हा युवकांचा काळ आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार, यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच, पण निर्णय मात्र नवीन पिढीचे रहाणार आहेत, असं सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुढची सूत्र आपल्याच हाती येणार असल्याचं स्पष्ट संकेत आमदार रोहित पवार यांनी दिले.

सहकारी मित्रांना कधीच विसरणार नाही

राजकारणात येताना मी खूप पुढचा विचार करुन आलोय. पदासाठी नाही मात्र, महाराष्ट्रासाठी मोठं काम करायचं आहे. लांबचं राजकारण करत असताना सहकारी मित्रांना कधीच विसरणार नाही, असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्र आपल्याच हाती येणार असल्याचं स्पष्ट संकेत दिले जुन्नर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर मेळाव्यात बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं आहे.

मी नेता नाही कार्यकर्ता

तर एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, मला लोकांत राहून काम करायला आवडते. मी नेता नाही कार्यकर्ता आहे. नेत्यानं लोकांच्या संपर्कात राहणं महत्त्वाचं असतं. महाराष्ट्रात जे घडलं ते खरं कारण वाटत नाही. तसं असतं तर चर्चा झाली असती. आता कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून तशा प्रकारची कारणे सांगितली जात आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला.

पुढच्या काळात शिवसेनेसोबत जाण्याचे आदेश नाहीत

शिवसेना कोणी फोडली ते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. त्यामागील कलाकार कोण आहे हेही त्यांनी सांगितलं. ती कला त्यांच्याकडेच आहे, असा टोला लगावत पवार पुढे म्हणाले की,ज्या उद्देशाने महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती तो उद्देश सत्ता संपुष्टात आल्याने राहिलेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सत्ता म्हणून महाविकास आघाडी अस्तित्वात नाही. परंतु महाविकास आघाडी संघटन म्हणून अस्तित्वात असायला पाहिजे असं अनेकांना वाटतं. पुढच्या काळात शिवसेनेसोबत जाण्याचे आदेश नाहीत. मात्र स्थानिक परिस्थिती घेऊन निर्णय घेतले जातील, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले.

शिवसेना फोडण्यामागचे कलाकार सगळ्या जगाला माहिती

शिवसेना राष्ट्रवादीने फोडली, शरद पवार अजित पवार यांनी शिवसेनेवर अन्याय केला असे आरोप केले जात आहेत. प्रत्यक्षात आदित्य ठाकरे यांच्या ग्रामीण भागातील दौऱ्याला शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी शिवसेना फोडल्याचं खापर राष्ट्रवादीवर फोडलं जात आहे. शिवसेना फोडण्यामागचे कलाकार सगळ्या जगाला माहिती आहेत, असे रोहित पवार म्हणाले.

युवकांना संधी दिली जाते की नाही पहावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमिट्या शरद पवार यांनी बरखास्त केल्या आहेत. त्यामागे काय भूमिका आहे, ते मला माहिती नाही. परंतु आज राज्यात युवकांना ताकद देण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पक्षाकडून युवकांना संधी दिली जाते की नाही पहावे लागेल. मला तशी अपेक्षा आहे, असे रोहित पवार म्हणाले.