जामखेड हादरले! इंजेक्शन टोचून घेत नर्सने संपवली जीवनयात्रा, खाजगी रुग्णालयातील धक्कादायक घटना, दोन चिमुरड्यांनी गमावले मातृछत्र
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील बस स्थानक परिसरातील लोंढे हाॅस्पीटल या खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथे कार्यरत असलेल्या २९ वर्षीय नर्सने इंजेक्शन टोचून घेत आपली जीवनयात्रा संपवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शबनम दस्तगीर सय्यद असे मृत नर्सचे नाव आहे.

मयत शबनम सय्यद ह्या नेहमीप्रमाणे गुरुवारी (दि. २३) सकाळी १० वाजता कामावर हजर झाल्या होत्या. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या हॉस्पिटलमधील बाथरूममध्ये गेल्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या बाहेर न आल्याने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्मचाऱ्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडून पाहिले असता शबनम या बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
इंजेक्शनने संपवले आयुष्य?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणी दरम्यान बाथरूममध्ये इंजेक्शनची सुई आढळून आली असून शबनम यांच्या हातावरही सुई टोचल्याची खूण दिसून आली आहे. त्यांनी स्वतःला कोणते औषध टोचून घेतले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंडलिक अवसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताचा ‘व्हीसेरा’ राखून ठेवण्यात आला असून तो पुढील तपासणीसाठी नाशिक येथे पाठवण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
टोकाचा निर्णय आणि दोन मुले पोरकी
शबनम सय्यद या विवाहित होत्या, मात्र घटस्फोट झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून त्या जामखेड येथील पोकळे वस्ती येथे आपल्या वडिलांकडे (दस्तगीर सय्यद) राहत होत्या. त्यांना ५ आणि ६ वर्षांची दोन लहान मुले आहेत. त्यांच्या निधनामुळे या दोन्ही चिमुरड्यांचे मातृछत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस तपास सुरू
याप्रकरणी मयताचे वडील दस्तगीर सय्यद (वय ५५) यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.