हळगावची वाटचाल हाॅटस्पाॅटच्या दिशेने ; प्रशासन अॅक्शन मोडवर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगावची वाटचाल आता हाॅटस्पाॅटच्या दिशेने होऊ लागली आहे. मागील अकरा दिवसांत हळगावमधील 18 जणांचे मृत्यू झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. लिंबूचे आगार असलेल्या हळगावमध्ये आता कठोर उपाययोजना राबवण्यासाठी तालुका प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. संपुर्ण गावाच्या कोरोना तपासणीसाठी प्रशासनाने  आजपासुन मोहिम हाती घेतली आहे. आज 07 रोजी दुपारपर्यंत आरोग्य विभागाने 100 RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. उद्याही 8 रोजी ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता तपासणीसाठी पुढे यावे असे अवाहन गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. दुसर्या लाटेत तब्बल 18 जणांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. हळगावची परिस्थिती एकिकडे बिघडत असतानाच झोपलेली ग्रामपंचायत व तालुका प्रशासन आता अॅक्शन मोडवर आले आहे. ग्रामपंचायतने गावातील सर्व गल्ल्यांना जोडणारे रस्ते आता बांबू टाकुन बंद केले आहेत. गावात सध्या दहा दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू आहे. हा कर्फ्यू 14 मे पर्यंत चालणार आहे. गावातील सर्व व्यवहार ठप्प आहेत.काही नतद्रष्ट व्यवसायिक मात्र गावावर ओढवलेल्या संकटातही आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी सरसावले आहेत. चोरून आपले धंदे करत आहेत. यामुळे कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी ती वाढतच चालली आहे.

दरम्यान तालुका प्रशासनाने आरोळे हाॅस्पीटलच्या मदतीने आज हळगावच्या आरोग्य उपकेंद्रात कोरोना तपासणी कँम्पचे आयोजन केले होते.  यावेळी गटविकास अधिकारी परशुराम कोकणी स्वता: दुपारपर्यंत हळगावमध्ये तळ ठोकून होते. यावेळी ग्रामसेविका निलिमा कुबसंगे, उपसरपंच अशोक रंधवे, धनंजय ढवळे,  आबासाहेब ढवळे,  आरोग्य सेविका नागरगोजे, संजीवनी बारस्कर सह आशा सेविका यावेळी उपस्थित होत्या. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत 100 RTPCR  स्वॅबनमुने ताब्यात घेण्यात आले. उद्या 8रोजी रॅपिड अँटीजेन चाचण्या व RTPCR तपासणी मोहिम हळगावमध्ये राबवली जाणार आहे. कोरोनाला घाबरून न जाता तातडीने चाचणी करून योग्य उपचार घेतले तर कोरोना बरा होतो यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता कोरोना तपासणीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.  आज 07 रोजी पार पडलेल्या तपासणी मोहिमेत नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. पुढील काही दिवस नागरिकांनी असाच प्रतिसाद द्यावा असे अवाहन गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी केले आहे.