Manohar Mama Bhosale Arrest: पूजेच्या नावाखाली व्यावसायिकाची लूट; भोंदू मनोहर भोसलेचा खेळ खल्लास, कुर्डुवाडी पोलिसांची मोठी कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच आणखीन एका भोंदू बाबाचे प्रकरण उजेडात आले आहे. एका व्यावसायिकाची ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर मामा भोसले (Manohar Mama Bhosale) आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे (Vishal Vaghmare) याला कुर्डुवाडी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. पुण्यातील मांजरी (Pune Manjari) येथे शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. (Kurduwadi Police)

Manohar Mama Bhosale arrest news, Kurduwadi police action, Vishal vaghmare,  Gautam kasabe,

सोलापूर येथील व्यावसायिक गौतम कसबे यांचा व्यवसाय सध्या आर्थिक अडचणीत होता. याचाच फायदा घेत मनोहर भोसले याने व्यवसायात प्रगती होण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, असे सांगून दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये भोसले याने आपल्या साथीदाराकरवी स्वीकारले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कसबे यांनी गुरुवारी (ता. २३) रात्री उशिरा कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पुण्यातून ठोकल्या बेड्या

फिर्याद दाखल होताच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या. मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे या दोघांना पुणे जिल्ह्यातील मांजरी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, उपनिरीक्षक सारिका गटकूळ आणि पथकाने ही धाडसी कारवाई पूर्ण केली.

विवादास्पद पार्श्वभूमी आणि गुन्ह्यांची मालिका

स्वतःला संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगणारा मनोहर भोसले यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत आला होता. २०२१ मध्ये त्याच्या विरोधात तक्रारींचा ओघ सुरू झाला होता. सध्या त्याच्यावर सोलापूर आणि पुणे ग्रामीण पोलिसांत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत

  • विनयभंग आणि बलात्कार
  • जादूटोणा विरोधी कायदा
  • फसवणूक आणि छळ

पोलीस अधीक्षकांचे जनतेला आवाहन

या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले, “फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. जर इतर कोणाचीही मनोहर भोसले याच्याकडून अशाच प्रकारे फसवणूक झाली असेल, तर त्यांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांत तक्रार नोंदवावी.”

या कारवाईत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पोलीस पथकाचा सहभाग होता. या अटकेमुळे सोलापूर आणि पुणे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.