स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादीने घेतला मोठा निर्णय

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

NCP has taken big decision regarding the election of local bodies

आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी करण्यासंदर्भात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष तसेच समाजवादी पार्टी आणि शेकाप यांच्यासोबत आघाडी करण्यासंदर्भात जिल्हास्तरावर अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आघाडी करण्याबाबतच्या सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, राज्य सरकारने काी चांगले काम केले तर कौतुकच करू, पण सरकारचे काही निर्णय चुकले तर राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेईल असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये शिर्डी येथे होणार आहे. या अधिवेशनाची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.

यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले की शिंदे गटांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एका विशिष्ट माध्यमातून नाराजी दिसून येत आहे असा टोला लगावत पाटील पुढे म्हणाले की, काँग्रेस आमच्या सोबत आहे.तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही आमच्या सोबत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबई आल्यानंतर कदाचित भूमिका बदलेल असे सांगत महाविकास आघाडीमध्ये कुठलाही बेबनाव नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत सप्टेंबरमध्ये पक्षांतर्गत होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष संघटनात्मक निवडणुकींच्या तयारीबाबत चर्चा झाली. सामान्य जनतेचे प्रश्न यावर राष्ट्रवादी आक्रमक होणार, असल्याचे पाटील यांनी सांगितले. पक्षातील प्रमुख नेत्यांना मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सामान्यांचे प्रश्न मांडण्याच्या सूचना शरद पवार यांनी आज नेत्यांना दिल्या, असेही पाटील यांनी सांगितले.