जामखेड : वेलीत पाय अडकला आणि बिबट्याचा घात झाला, वनविभागाने धामणगावात केले मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार.

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील धामणगाव परिसरातील जंगलात नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Jamkhed, Leg stuck in vine and leopard died, forest department cremated dead leopard in Dhamangaon

जामखेड तालुक्यातील धामणगाव परिसरात मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षाचे होते. सदर बिबट्याचा मृत्यू तीन चार दिवसांपुर्वी झाला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.

सदर मृतावस्थेतील बिबट्याचे खालचे अंग आणि मुंडके सडलेल्या अवस्थेत होते. खालच्या भागात आळ्या पडल्या होत्या. घटनास्थळी बिबट्याचा पाय एका वेलीत अडकल्याचे दिसून आले.वेलीत पाय अडकल्यामुळे बिबट्या उपाशी राहिला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती वनपाल प्रविण उबाळे यांनी दिली.

Jamkhed, Leg stuck in vine and leopard died, forest department cremated dead leopard in Dhamangaon

जामखेड तालुक्यातील धामणगाव शिवारातील फाॅरेस्ट गट नंबर 440 मध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्यानंतर जामखेड वनविभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली होती. या टीमने घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला. त्यानंतर मृत बिबट्याच्या शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.

दरम्यान बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. खर्डा येथील पशुवैद्यकीय डॉक्टर कुलदीप चौरे, डाॅ अर्जुन जाधव आणि पाचरणे यांच्या टीमने मृतावस्थेत बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्याचा पंचनामा केल्यानंतर घटनास्थळीच बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Jamkhed, Leg stuck in vine and leopard died, forest department cremated dead leopard in Dhamangaon

यावेळी धामणगावचे सरपंच महारूद्र महारनवर, वनपाल प्रविण उबाळे, वनरक्षक किसन पवार, वनकर्मचारी शहाजी नेहरकर, शिवाजी चिलगर, बाप्पूसाहेब जायभाय, भाऊसाहेब भोगल, रामकिसन लहाने सह धामणगाव- तेलंगशी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामखेड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. विशेषता: बालाघाटाच्या भागातील गावांमध्ये बिबट्याचे दर्शन झाले होते. काही भागात पाळीव प्राण्यांवर  हल्ले झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली मंदावल्या होत्या.

मात्र आज अचानक बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने जामखेड तालुक्यात बिबट्याचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाने दिलेल्या सुचना पाळून सतर्क राहणे आवश्यक आहे.

दरम्यान जामखेड तालुक्यातील धामणगाव भागात नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्यामुळे या भागात मादी बिबट्या असू शकतो, त्यामुळे रानच्या वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे अवाहन वनपाल प्रविण उबाळे यांनी केले आहे.