शिंदे सरकारच्या 24 दिवसांत महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या रेकॉर्डब्रेक आत्महत्या

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित सरकार सत्तेवर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर येताच शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार अशी घोषणा केली. राज्यातील बळीराजाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिला खरा, पण राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. शिंदे सरकार सत्तेवर येऊन 24 दिवस उलटत आले आहेत. या काळात राज्यात शेतकऱ्यांच्या रेकॉर्डब्रेक आत्महत्या झाल्याची बाब उघड झाली आहे.

महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन होऊन 24 दिवस उलटत आले आहेत. अजूनही राज्य मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्याचा कारभार हाकत आहेत. शिवसेना विरुद्ध शिंदे हा वाद सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन पोहचला आहे. सत्तासुंदरीचा सारीपाट घटनात्मक पेचावर पोहचला आहे. शिंदे गटाची ताकद वाढावी यासाठी सर्व शक्ती मुख्यमंत्र्यांकडून खर्ची घातली जात आहे. राज्यात पावसामुळे अनेक भागात मोठे नुकसान केले आहे. राज्याला पूर्णवेळ कृषीमंत्री असणे आवश्यक होते पण याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार असा संकल्प बोलून दाखवला होता, परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले हे वक्तव्य राज्यातील शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यात अपयशी ठरल्याचे आता समोर आले आहे. सरकार स्थापनेच्या 24 दिवसांत राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आता उघडकीस आले आहे. औरंगाबाद, बीड, यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.याबाबतचे वृत दिव्य मराठीने दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक घोषणा केल्या आहे. आतापर्यंत शिंदे आणि फडणवीस यांनी तीनवेळा मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्यात. या बैठकांमध्ये शहरांचं नामांतर, थेट सरपंच निवडणूक, आरे कारशेड, एमएमआरडीएच्या कर्जाची घोषणा केली आहे, पण अजूनही शेतकऱ्यांना दिलासा देणारी कोणताही घोषणा सरकारने केली नाही. राज्यात आधीच अस्मानी संकट आले असताना कृषि खात्याचा कारभार अजूनही वाऱ्यावरच आहे.

राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये बळीराजा चेतना अभियान, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन स्थापन केले.पण या दोन्ही योजना मंत्रालयातच अडकलेल्या आहे. 1 जानेवारी ते जून या 6 महिन्यात मराठवाड्यात 306 आणि विदर्भामध्ये 368 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, यावेळी एकनाथ शिंदे हे त्या सरकारमध्येच होते. एवढंच नाहीतर कृषिमंत्री सुद्धा शिंदे गटात असलेले दादा भुसे हेच होते.

मागील 23 दिवसांतील राज्यातील शेतकरी आत्महत्या खालील प्रमाणे (जिल्हानिहाय आकडेवारी)

 • औरंगाबाद  22
 • बीड 13
 • यवतमाळ 12
 • परभणी 6
 • जळगाव 6
 • जालना 5
 • बुलडाणा 5
 • उस्मानाबाद 5
 • अमरावती 4
 • वाशिम 4
 • अकोला 3
 • नांदेड 2
 • भंडारा-चंद्रपूर 2